News Flash

चित्ररंग:व्यवस्थेवर चुरचुरीत भाष्य

न्यायालयीन खटला दाखविणारा चित्रपट म्हणजे अगदी हिंदी सिनेमातील ‘टिपिकल’ खटल्याचे चित्र डोळ्यांसमोर येते, किंबहुना कोर्टाची पायरी न चढलेल्या लोकांना एकदम आलिशान, स्वच्छ, कागदपत्रे व्यवस्थित रचून

| March 17, 2013 12:35 pm

न्यायालयीन खटला दाखविणारा चित्रपट म्हणजे अगदी हिंदी सिनेमातील ‘टिपिकल’ खटल्याचे चित्र डोळ्यांसमोर येते, किंबहुना कोर्टाची पायरी न चढलेल्या लोकांना एकदम आलिशान, स्वच्छ, कागदपत्रे व्यवस्थित रचून ठेवलेले न्यायालय असते असे हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना वाटत असते; परंतु न्यायालयाचे आजच्या काळातील अस्सल चित्रण, त्यातील कारभाराचे स्वरूप हे दाखविण्याबरोबरच खऱ्याचे खोटे, खोटय़ाचे खरे करायला लावणारा वकिलीचा व्यवसाय, वकिली डावपेच, प्रतिष्ठा आणि बहुप्रलंबित न्याय असे सगळे वास्तव दाखविणारा ‘जॉली एलएलबी’ हा चित्रपट रंजनाबरोबरच वास्तवाची जाणीव करून देणारा आहे.
‘हिट अ‍ॅण्ड रन’ खटले मुंबईत किंवा राजधानीत अलीकडे वरचेवर घडले आहेत. सेलिब्रिटी किंवा बडय़ा धेंडांची मुले यांच्या हातून घडलेली प्रकरणे प्रेक्षकांना माहीत आहेतच. अशाच एका खटल्यावरचा हा चित्रपट आहे. जॉली म्हणजेच जगदीश त्यागी (अर्शद वार्सी) हा नुकताच एलएलबी पूर्ण करून मेरठच्या सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू करणारा तरुण अपयशाचे धक्के पचवत पचवत वकिली करतोय. एकही खटला तो जिंकण्यापेक्षाही अशील गाठण्यातच त्याचा बराचसा वेळ जातोय. नामांकित, प्रतिष्ठित, श्रीमंत वकील बनण्याची महत्त्वाकांक्षा त्याला दिल्लीसारख्या महानगरांत जाऊन वकिली करण्यासाठी प्रवृत्त करते. दिल्लीसारख्या महानगरांत तर शेकडो अशील भेटतील, चांगली वकिली करून भरभक्कम पैसे मिळवू या उद्देशाने तो दिल्लीच्या सत्र न्यायालयात वकिली सुरू करतो, पण तिथेही अशील मिळविण्यात तो अपयशी ठरतं, प्रत्यक्ष खटला लढविण्याची तर बातच सोडा. जॉलीचा हा ‘स्ट्रगल’ दाखविताना दिग्दर्शकाने एक छोटासा पण महत्त्वाचा प्रसंग दाखविला आहे. काही दिवसांपूर्वी ज्या पोलिसाने दहशतवादी पकडून दिलेले असतात, त्यांना न्यायालयासमोर हजर करायचे असते. त्यांची संख्या खरी चार असते, परंतु चुकून मंत्रीमहोदयांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर पाच अतिरेकी असल्याचे सांगितल्यामुळे त्या पोलिसाला न पकडलेला आणखी एक अतिरेकी आणायचा कुठून असा प्रश्न पडतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी रिकामटेकडा वकील असलेल्या जॉलीला हजार रुपयांच्या बदल्यात चेहऱ्यावर बुरखा घालून अतिरेकी म्हणून उभे केले जाते. या छोटय़ाशा प्रसंगातून दिग्दर्शक बरेच काही सांगून जातो. यशस्वी, नामांकित वकील बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेला जॉली घरभाडे भरायलाही पैसे नाहीत म्हणून एक हजार रुपये घेऊन अतिरेक्याचा बुरखा तात्पुरता घालायला तयार होतो. पोलीसही सरकारची लाज वाचविण्यासाठी ही नामी युक्ती लढविण्यास तयार होतो. या सगळ्यातून व्यवस्था कशी चालते याची झलक पाहायला मिळते.  
हिट अ‍ॅण्ड रन खटल्यामध्ये नामांकित घराण्याचा एकुलता एक वारस असलेला तरुण दोषी असल्यामुळे पुरावे नष्ट करण्यापासून पोलीस व्यवस्थेतील अधिकाऱ्यांपासून ते वकील, न्यायालयातील कर्मचारी या सगळ्यांनाच पैशाच्या जोरावर आपल्या बाजूने वाकविण्याचा प्रयत्न प्रतिष्ठित वकील राजपाल (बोमन इराणी) करतो. नामांकित, प्रतिष्ठित ए वन वकील अशी ख्याती असलेला राजपाल विरुद्ध सर्वसामान्य एलएलबी शिकलेला अननुभवी वकील जॉली यांचा संघर्ष आणि त्यातून घडणारे नाटय़, न्यायाधीशांसमोर असूनही सगळे शिष्टाचार धुडकावून वागणे, न्यायाधीशही अनेकदा बचाव पक्षाचे वकीलपत्र घेणाऱ्या राजपालशी तो वरिष्ठ आणि प्रतिष्ठित वकील असल्याने गप्पा करतात, अमुकतमुक ठिकाणी फ्लॅट घेण्याविषयी विचारणा करतात, अशा छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून व्यवस्थेतील अनेकांचे एकमेकांशी असलेले साटेलोटे प्रेक्षकांसमोर प्रभावी पद्धतीने दिग्दर्शकाने आणले आहे.नुकताच वकील बनल्यामुळे फारसे इंग्रजी न येणारा जॉली प्रतिज्ञापत्रामध्ये प्रॉसिक्यूशनऐवजी प्रॉस्टिटय़ूशन आणि अपीलऐवजी अ‍ॅपल असे लिहितो आणि त्यावरून न्यायाधीश (सौरभ शुक्ला) चिडतात आणि प्रेक्षकांमध्ये हशा पिकतो. सुरुवातीला पैसे बघून सातव्या अस्मानात पोहोचलेला जॉली नंतर सत्यमेव जयते म्हणत हिट अ‍ॅण्ड रनमुळे मरण पावलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दंड थोपटतो तेव्हा त्याची सत्याची बाजू सिद्ध करण्यासाठी त्याला किती आटापिटा करावा लागतो हे फिल्मी पद्धतीने न दाखविता प्रेक्षकाच्या सर्वसामान्य बुद्धीला पटेल अशा पद्धतीने तरीही प्रभावी ठरेल असे दाखविल्यामुळे प्रेक्षक न्यायालयीन नाटय़ात रमून जातो.  अर्शद वार्सीसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. त्याची आतापर्यंतची पडद्यावरची प्रतिमा बदलून टाकणारी व्यक्तिरेखा त्याने समर्थपणे साकारली आहे. सगळ्या चित्रपटात सौरभ शुक्ला भाव खाऊन जातो. चरित्र व्यक्तिरेखा साकारणारा हा कलावंत न्यायाधीशातील अधिकारी आणि माणूस अशा दोन्ही बाजू समर्पक पद्धतीने दाखविण्यात यशस्वी ठरलाय.
अर्थात लेखन-दिग्दर्शनाचा या यशातील वाटाही महत्त्वाचा म्हटला पाहिजे, पण कोणतीही व्यक्तिरेखा मग कल्लूमामाची असो की न्यायाधीशाची असो, चोख पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यातले अभिनयाचे कसब या चित्रपटातही सौरभ शुक्लाने दाखवून दिले आहे. न्यायालयाच्या रूक्ष वातावरणातील वकील, आरोपी, न्यायाधीश यांचे वागणेबोलणे, पोलिसांची विविध ठिकाणच्या नेमणुकीसाठी लागणारी हजारो-लाखोंची बोली यातून व्यवस्थेवर भाष्य करण्यातही दिग्दर्शक यशस्वी ठरतो.
जॉली एलएलबी
दिग्दर्शक – सुभाष कपूर, कलावंत – बोमन इराणी, अर्शद वार्सी, अमृता राव, विभा छिब्बर, मोहन कपूर, सौरभ शुक्ला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:35 pm

Web Title: brite talk on system
Next Stories
1 चित्रगीत
2 नाट्यरंग : घराणेशाहीचे रंजक विडंबन
3 ‘लुटेरा’साठी घेतली ‘लिबर्टी’
Just Now!
X