शहरातील कुमठा नाक्याजवळील मुमताज नगरात बंद घर फोडून चोरटय़ांनी सहा लाख ३८ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. यात चोरटय़ांनी २३ तोळे सोने व १९ तोळे चांदीसह रोख दीड लाखांची रक्कम पळविली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली आहे.
रुकूम मकदूम बागवान (वय ५१) हे मुमताजनगरात कुटुंबीयांसह राहतात. सायंकाळी बागवान कुटुंबीय घराला कुलूप लावून विवाहसोहळय़ासाठी अक्कलकोट तालुक्यातील नावदगी येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते परत येईपर्यंत चोरटय़ांनी या बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटून २३ तोळे सोन्याचे दागिने, १९ तोळे चांदीचे दागिने व दीड लाखाची रोकड असा एकूण सहा लाख ३७ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. घरफोडी झाल्याचे दिसून येताच बागवान कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला. पोलिसांनी या गुन्हय़ाचा तपास करण्यासाठी श्वानपथकाची मदत घेतली. परंतु त्याचा उपयोग झाला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.