डोंबिवली शहरात कल्याण-डोंबिवली पालिकेकडून चौदा रस्त्यांची काँक्रीटीकरण, डांबरीकरणाची कामे सुरू असून ती करताना पालिकेच्या ठेकेदाराने ‘भारत संचार निगम’च्या जमिनी खालून गेलेल्या दूरध्वनी, इंटरनेट सेवा देणाऱ्या केबल वाहिन्या तोडून टाकल्या आहेत. यामुळे ‘बीएसएनएल’चे एक हजारहून अधिक दूरध्वनी बंद आहेत. इंटरनेट सेवा अनेक ठिकाणी ठप्प आहे. या वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी ‘बीएसएनएल’ला लाखो रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे रस्ते डागडुजी करताना पालिकेच्या ठेकेदाराकडून ‘बीएसएनएल’चे जे नुकसान केले आहे, ते भरून देण्यासाठी ‘बीएसएनएल’ने १ कोटी २२ लाख रुपयांची नुकसानभरपाईची पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे.
रस्ते कामासाठी पालिकेने ‘महावितरण’च्या भूमिगत वाहिन्या तोडून ‘महावितरण’चे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान केले आहे. महावितरणने दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा दावा पालिकेकडे केला आहे. ‘बीएसएनएल’चे डोंबिवली विभागाचे मंडल अधिकारी शाळीग्राम गेडाम यांनी पालिकेचे प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना पत्र पाठवून सव्वा कोटी रुपये भरपाईची मागणी केली आहे.
डोंबिवलीतील पाटकर रस्ता, फडके रस्ता, दीनदयाळ रस्ता, घरडा सर्कल, राजाजी पथ, चार रस्ता, रॉथ रस्ता, मानपाडा रस्ता अशा अकरा ठिकाणी पालिकेची रस्त्याची कामे सुरू आहेत. या सर्व ठिकाणी निगमच्या वाहिन्या जेसीबीने काम करताना तोडून टाकण्यात आल्या आहेत.
या वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी निगमकडे स्वतंत्र निधी नसतो. वाहिन्या तुटल्याने परिसरातील दूरध्वनी, इंटरनेट सेवा ठप्प झाल्या आहेत. त्या माध्यमातून विभागाचा महसूल बुडत आहे. नागरिकांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. या रस्ते कामांमुळे वाहिन्यांचे ४० टक्के नुकसान झाल्याचे अभियंता गेडाम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
‘निगमकडून योग्य रीतीने वाहिन्या टाकल्या जात नाहीत. त्यामुळे त्या तुटतात. रस्ते कामांमुळे वाहिन्या तुटल्यात ते ‘बीएसएनएल’ने सिद्ध करावे असे त्यांना कळवण्यात आल्याचे पालिकेचे प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी पत्रकारांना सांगितले.