भारत दुरसंचार निगमच्या भ्रमणध्वनी सेवेला ग्राहक चांगलेच वैतागल्याच्या असंख्य तक्रारी होत असताना दुसरीकडे संबंधितांनी हा रोष कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांद्वारे सुविधा देण्याची धडपड चालवली आहे. पोस्टपेड ग्राहकांसाठी बीएसएनएलने अनेक योजना सादर केल्या आहेत. त्या अंतर्गत पाच भ्रमणध्वनीसाठी एकच देयक, सीयूजी गटात २५ रुपये अतिरिक्त देऊन समूहातील घटकांबरोबर लँडलाईन दुरध्वनीवर मोफत बोलणे आदींचा समावेश आहे.
बीएसएनएल बोर्डाचे महाप्रबंधक एन. के. गुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली. बीएसएनएल ही देशपातळीवर भ्रमणध्वनी सेवा पुरविणारी मोठी कंपनी आहे. ‘पोस्ट पेड’ ग्राहकांसाठी अधिक सुविधा असणाऱ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. दरमहा ५२५ रुपयांपेक्षा कमी मासिक शुल्क भरणाऱ्या ग्राहकांना आता आपले नवीन व जुने अधिकाधिक पाच भ्रमणध्वनी क्रमांकाचे एकच देयक मिळवता येईल. दरमहा २५ रुपयांचे अ‍ॅड ऑन पॅक घेऊन. कॉर्पोरेट ग्राहक तसेच ५२५ व त्यापुढील प्लॅनधारकांना ही सुविधा मोफत उपलब्ध आहे. सीयूजी अ‍ॅड ऑनमध्ये नवीन आणि जुन्या अधिकाधिक पाच क्रमांकाचा एक समूह करून त्यांना नि:शुल्क बोलण्यासाठी प्रत्येक क्रमांकाला दरमहा २५ रुपयांचा अतिरिक्त अ‍ॅड ऑन पॅक घेऊन सीयूजी बनविता येईल. या अंतर्गत बीएसएनएलच्या कोणत्याही एका लँड लाईन दुरध्वनीवर नि:शुल्क संपर्क साधता येईल. ‘पूल अ‍ॅण्ड फ्री बीज शेअरिंग या सुविधेद्वारे नवीन ग्राहक दरमहा केवळ २५ रुपये शुल्क भरून अन्य पोस्टपेड पाच ग्राहकांशी आपआपसात संवादाचा पूल बांधू शकतील.
या शिवाय, प्रतिमहा २५ रुपये शुल्क देऊन तसेच प्रतिमाह १०० रुपये भरून सीयूजी क्रमांकाचे ग्राहक आपल्या नेटवर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पूर्ण दिवस अथवा दुसऱ्या नेटवर एक तास नि:शुल्क राष्ट्रीय कॉलवर बोलू शकेल. ज्यांच्याकडे पाच किंवा त्यापेक्षा अधिक भ्रमणध्वनी आहेत, अशा पोस्टपेड ग्राहकांना ही योजना लाभदायक ठरणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान, बीएसएनएलच्या भ्रमणध्वनी सेवेबद्दल ग्राहकांकडून वारंवार रोष प्रगट केला जातो. या तक्रारींचे तातडीने निराकरण होत नसल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.