लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्याचे लक्षात घेऊन बहुजन समाज पार्टीने महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील काही जिल्ह्य़ांत अधिक भर देण्याची रणनीती आखली असून, पक्ष प्रमुख मायावती यांच्या जन्मदिवसांचे औचित्य साधून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी नागपुरात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
बसपाला विधानसभेत विदर्भात उत्तर नागपूर, उमेरड, भंडारा मतदारसंघात भरघोस मते मिळाली. महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला अधिक पसंती देत असल्याचे या निवडणुकीआधीचे चित्र होते. परंतु विदर्भात मतांची टक्केवारी वाढल्याचे दिसताच बसपाने या संधीचे सोने करण्याचे ठरविले आहे.
यामुळे या भागात अधिकाधिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मायावती यांचा ५९ वा जन्मदिवस ‘जनकल्याणकारी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तर नागपूर आणि विदर्भातील कार्यकर्त्यांना मागदर्शन केले जाणार आहे.
या जनकल्याणकारी समारंभाला विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्य़ातून मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते तसेच जनतेला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी सायंकाळी प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अ‍ॅड. वीरसिंग, अ‍ॅड. सुरेश माने, प्रदेश अध्यक्ष विलास गरुड, प्रदेशाध्यक्ष कृष्णाजी बेले, प्रदेश सरचिटणीस किशोर गजभिये, प्रदेश सचिव अहमद कादर यांनी उपस्थित राहणार आहेत.
इंदोरा मैदानावर आयोजित विदर्भस्तरीय समारंभात  गरीब, गरजू, विधवा, अपंग, अनाथ आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू भेट दिल्या जाणार आहेत.
शिवाय रोगनिदान शिबीर, कायदेविषयक शिबीर, नेत्र चिकित्सा, चष्मे वाटप कार्यक्रम आणि विद्याथ्यार्ंसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. कांशीरामजींच्या परिवर्तनवादी चळवळीत योगदान असलेल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
धम्म चळवळ गतिमान करणाऱ्या भिक्खू संघाला ‘चिवरदान’ आणि ‘भोजनदान’चे आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. १५ जानेवारीला अशाच प्रकारचा कार्यक्रम  औरंगाबाद आणि मुंबईतदेखील आयोजित करण्यात येणार आहे.