News Flash

बौद्ध भिक्खू भदंत महापंथ निवडणुकीच्या मैदानात

संपूर्ण हयात समाजाच्या उत्थानासाठी घालविल्यानंतर बौद्ध भिक्खू भदंत महापंथ यांनी राजकारणाचा मार्ग चोखाळण्याचा निर्णय घेतला आहे.

| October 14, 2014 07:24 am

संपूर्ण हयात समाजाच्या उत्थानासाठी घालविल्यानंतर बौद्ध भिक्खू भदंत महापंथ यांनी राजकारणाचा मार्ग चोखाळण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सामाजिक सेवेच्या कक्षा अधिक रुंदावण्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतली असून, यंदा निवडणूक मैदानात उतरणारे राज्यातील ते एकमेव बौद्ध भिक्खू आहेत.
भदंत महापंथ भिक्खू होण्यापूर्वी शिक्षिकी पेशात होते. समाजकार्याची बालपणापासूनच आवड असल्याने त्यांनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला वेगळे वळण मिळाले. भंडारा जिल्ह्य़ातील एका खेडय़ात जन्मलेल्या भदंत महापंथ यांची लहानपणीच धम्मकार्यात रुची दिसून येत होती. आई-वडिलांनी मुलाचा कल ओळखला आणि विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन त्यांच्याकडून करवून घेतले. भदंत अर्थशास्त्रात पदव्युत्तर झाले आणि शिक्षण शास्त्रातील पदवी घेतली. ते नागपुरातील सीताबर्डी येथील कुर्वेज हायस्कूलमध्ये दहा वर्षे शिक्षक होते. राजीनामा देऊन त्यांनी इंदोऱ्यातील ज्योतीनगरमध्ये शाळा काढली. आता त्यांच्या संस्थेचे दोन कनिष्ठ महाविद्यालय आणि एक विद्यालय, उच्च प्राथमिक शाळा आणि मुलांमुलीकरिता दोन वसतिगृहे आहेत. हे शैक्षिणक कार्य सुरू असताना वयाच्या २९व्या वर्षी ते श्रामनेर झाले आणि दोनच वर्षांनी म्हणजे ७ एप्रिल १९८२ मध्ये बौद्ध भिक्खू झाले. यानंतरही शैक्षणिक कार्य आणि स्वत:चे शिक्षण सुरू ठेवले. त्यांनी पाली, पाकृतमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. धम्माच्या माध्यमातून जनसेवा करण्यासाठी वाडीजवळ एक बौद्ध विहार उभारला. तेथे २० बौद्ध भिक्खू आहेत. याहीपुढे जाऊन वाडी येथे ध्यानकेंद्र, शून्यगार आणि भिक्खू प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे.
भदंत महापंथ यांचे शैक्षणिक आणि बौद्ध भिक्खू म्हणून धम्म कार्य सुरू असले तरी तरुणपणी त्यांच्यावर बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या विचाराचा प्रभावदेखील होता. त्यामुळेच त्यांनी जनसेवा करण्यासाठी राजकारणाचा मार्ग स्वीकारला असून, ते नागपूर जिल्ह्य़ातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.
समाज विघटित झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून समाजापुढे एका आदर्श राजकीय पक्षाची संकल्पना मांडली, परंतु आज आरपीआयची शकले झाली आहेत. या पक्षाच्या नेत्याची फाटाफूट झाली आहे. समाजाला दिशा देणारा नेता आणि पक्ष आज अस्तित्वात नाही. नीतीचे राज्य निर्माण करण्यासाठी, समाजाला संघटित करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवित आहे, असे भदंत यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 7:24 am

Web Title: buddhist bhikkhu bhadanta mahapantha in election
टॅग : Election,Nagpur,Vidarbh
Next Stories
1 अपक्षांच्या भाऊगर्दीत मोजकेच ‘सक्षम’
2 सोनिया गांधींच्या सभेनंतर ब्रम्हपुरीतील लढत ‘हाय प्रोफाईल’
3 अमरावतीत पक्षांचे जातीय मतविभागणीकडे लक्ष
Just Now!
X