सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या सोलापूर महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न पालिकेच्या आगामी २०१३-१४ च्या वार्षिक अर्थसंकल्पातून हाती घेण्यात आला आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने मांडलेला अर्थसंकल्प ८२५ कोटी ८६ लाख ४२ हजारांचा आहे. यात विकासकामांसाठी अवघ्या १३७ कोटींच्याा निधीची तरतूद सुचविण्यात आली आहे. तर सध्याच्या पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर पाण्यासाठी अडीच कोटीचा निधी दर्शविण्यात आला आहे. मात्र या अर्थसंकल्पीय सभेत विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर तुटून पडत जोरदार फटकारे मारले.
शनिवारी महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय सभेला सुरूवात झाल्यानंतर स्थायी समितीचे सभापती इब्राहमी कुरेशी यांनी पुढील २०१३-१४ वर्षांचा अर्थसंकल्प मांडला. त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प ७३७ कोटी ७५ लाख ६७ हजारांचा होता. त्यात सभागृह नेते महेश कोठे यांनी वाढ तथा दुरूस्ती सुचवून तो ८२५ कोटी ८६ लाख ४२ हजार १३ रुपयांचा केला. त्यास मंजुरी देण्याची सूचना त्यांनी मांडली. तर भाजप-सेना युतीच्यावतीने विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांनी सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त म्हणजे ८३२ कोटी ६८ लाखांचा अर्थसंकल्प सादर करणारी उपसूचना मांडली.
सभागृह नेते महेश कोठे यांनी सूचना केलेल्या अर्थसंकल्पात आरंभीच्या शिल्लक ४ लाख २२ हजारांसह महसुली जमेच्या बाजूने ३९७ कोटी ४१ लाख १८ हजार व पाणीपुरवठय़ासाठी ६२ कोटी ५८ लाख ८० हजार याप्रमाणे  एकूण ४६० कोटी ४ लाख २० हजार १३ रुपये महसुली आणि महसुली निधीतून भांडवली कामे, अनुदानातून करावयाची कामे, कर्ज, विशेष अनुदान, शासकीय अनुदान व विकास कामांचे अनुदान असे मिळून ३६५ कोटी ८२ लाख २२ हजार याप्रमाणे महसुली व भांडवली मिळून ८२५ कोटी ८६ लाख ४२ हजार १३ रुपये दर्शविण्यात आले आहेत.
महसुली जमेच्या बाजूने आयातकर/स्थानिक स्वराज्य संस्था करप्रणालीपोटी-१६०कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे, तर शासन अनुदान-४० कोटी, हद्दवाढ भागात मालमत्ता करासाठी सुमारे ५० हजार मिळकतींचा शोध घेणे-५ कोटी, जनारोग्य-एक कोटी ८५ हजार, जाहिरातींपासून उत्पन्न-७५ लाख, विकास शुल्क-१६ कोटी ५० लाख यांचा समावेश आहे.
पालिका पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामांसाठी ९ कोटी ८०लाखांची तरतूद सुचविण्यात आली आहे. यात महापौरांसाठी तीन कोटी, तर उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती व सभागृह नेते यांच्यासाठी प्रत्येकी दोन कोटी आणि विरोधी पक्षनेत्यासाठी ८० लाखांची तरतूद समाविष्ट आहे. याशिवाय पदाधिकाऱ्यांच्या ऐच्छिक खर्चासाठी म्हणून २० लाख ५० हजारांची तरतूद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी १० कोटी ३०लाखांची तरतदू सुचविण्यात आली आहे. महसुली निधीतून भांडवली कामांसाठी ९३ कोटी ५० लाखांचा निधी सुचविण्यात आला आहे.
वॉर्ड विकासासाठी सहा कोटी ४२ लाखांची तरतूद सुचविण्यात आली असून याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाला आपल्या वॉर्डाच्या विकासासाठी प्रत्येकी सहा लाखांची निधी उपलब्ध होऊ शकेल. महिलांसाठी सार्वजनिक रस्त्यांवर तीन कोटी खर्च करून शौचालये बांधण्याची योजना सुचविण्यात आली आहे. दिवाबत्ती-२ कोटी, रस्ते-२७ कोटी, दवाखाना सुधारणा-२ कोटी, मलनि:सारण-३ कोटी, सुजल योजना-५ कोटी, अक्कलकोट रोड एमआयडीसीटचा पायाभूत विकास-७०  लाख, सोलापूर महापालिकेचा सुवर्णजयंती महोत्सव साजरा करणे-२ कोटी याप्रमाणे विविध कामांसाठी आर्थिक तरतूद दर्शविण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या घरकुल आवास योजनेतून भगवान नगर व राहुल गांधी या दोन झोपडपट्टय़ांच्या खासगी तत्त्वावरील विकासासाठी ९ कोटींची तरतूद आहे.
मागील दहा वर्षांपासून संपूर्ण आरोग्य विभागाकडील खरेदी-विक्रीचे लेखापरीक्षण करणे, शहरात समान पाणीपुरवठा करण्यासाठी मीटरप्रणालीचा अवलंब करणे, खासगी शाळांकडील थकबाकीसाठी योजना राबविणे, राणी लक्ष्मीबाई भाजी मंडईचे खासगीकरण करणे, कर व पाणीदर वसुली इष्टांकापेक्षा कमी प्रमाणात करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वेतनश्रेणी थांबविण्याची कारवाई करणे, महापालिकेच्या कारभारात सुधारणा होण्यासाठी दुबार नोंद प्रणाली कार्यान्वित करणे, महापालिकेच्या सर्व परिमंडळ कार्यालयांची एकत्रितरित्या माहिती उपलब्ध होण्यासाठी स्वॉफ्टवेअर विकसित करणे, आदी स्वरूपात सूचना व शिफारशी सुचविण्यात आल्या आहेत.
या अर्थसंकल्पावर सायंकाळी उशिरापर्यंत सभागृहात चर्चेचे गुऱ्हाळ चालू होते. सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे समर्थन करताना आक्रमक पवित्रा घेत विरोधकांसह प्रशासनावर बरेच तोंडसुख घेतले. ही अर्थसंकल्पीय सभा उद्या रविवारी दुसऱ्या दिवशीही चालणार आहे.