दिवाळीत किल्ले बनविण्याच्या मुलांच्या हौसेला शाळेचा उपक्रम बनवून त्याचा इतिहास आणि भूगोल शिक्षणासाठी वापर करण्याचा आगळावेगळा प्रयोग अलिबागमधील एका शाळेने केला आहे.
मुंबईसारख्या शहरांच्या ठिकाणी दिवाळीत किल्ले बनविणे हा प्रकार तसा नेहमीचाच बनला आहे. पण, अलिबागच्या कुरूळ तालुक्यातील ‘सृजन प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालया’ने किल्ले बनविणे या हौस-मौजेच्या उद्योगाला शाळेच्या उपक्रमांचा एक भाग बनविला आहे. दरवर्षी शाळेतर्फे दिवाळीत किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घराच्या अंगणातच किल्ला करायचा. दिवाळीतील एका दिवशी दोन-तीन शिक्षक हे किल्ले बघायला मुलांच्या घरी जातात. मुलांना त्यांच्या कल्पनेने हवा तसा किल्ला बांधावा. पण, त्या बरोबर किमान एका किल्ल्याची माहिती, त्याचा इतिहास याची माहिती मिळवावी ही अपेक्षा असते. बरीच मुलेमुली तसा प्रयत्न करतात. दरवर्षी थोडे-थोडके नव्हे, तर तब्बल ६० ते ७० किल्ले या निमित्ताने गावच्या ठिकठिकाणच्या अंगणात साकारले जातात.
‘यात अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांची मुलांच्या पालकांशी भेट, सुसंवाद होतो. पालकांनाही आपल्या मुलांनी तयार केलेल्या किल्ल्याची प्रशंसा खुद्द शिक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळते. अनेक पालक यामुळे हरखून जातात. हा उपक्रम मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याबरोबरच शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये मैत्रीचे बंध निर्माण करणाराही ठरतो. पालकांच्या चहा, फराळाच्या आग्रहाला तोंड देताना शिक्षकांची दमछाक होते. मुलेही या संवादामुळे हरखून जातात,’ अशा शब्दात शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी या उपक्रमाचे आणखी एक फलित उलगडले. किल्ले बनविण्याची स्पर्धा ही दिवाळीपुरती मर्यादित न ठेवता या सगळ्या किल्ल्यांची छायाचित्रे काढून त्यांचे प्रदर्शन शाळेच्या स्नेहसंमेलनात ठेवले जाते. त्यामुळे, कुरूळ तालुक्यातील कच्चीबच्ची दरवर्षी नवीन कपडे, फराळ, कंदील, दिवे बनविणे यांच्याबरोबरच किल्ला बनविण्याच्या स्पर्धेकरिता म्हणून दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. ६० ते ७० किल्ले पाहण्यासाठी गाव पिंजून काढावा लागला. त्यात ऑक्टोबर हीट आणि घामाच्या धारा. पण, नवीन विद्यार्थ्यांनी तयार केलेले किल्ले शोधण्यासाठी मुलांची फौज घेऊन गावचा फेरफटका मारला. अर्थात मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता, अशी प्रतिक्रिया सुनील पाटील या शिक्षकांनी व्यक्त केली. पाटील सर आणि त्यांच्याच नावाचे आणखी एक शिक्षक सर आणि ऋ तिका पाटील हे तिघे शिक्षक या उपक्रमाकरिता खूप मेहनत घेतात.