24 September 2020

News Flash

बिल्डरांची दिवाळी भेट..

मुंबई महानगर प्रदेशातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विकल्या न गेलेल्या घरांमुळे चिंतीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी घरखरेदीसाठी असलेला दीपावलीचा मुहर्त साधण्यासाठी नेहमीप्रमाणे ग्राहकांना सोन्याची नाणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारख्या भेटवस्तूंबरोबरच

| November 13, 2012 10:37 am

मुंबई महानगर प्रदेशातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विकल्या न गेलेल्या घरांमुळे चिंतीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी घरखरेदीसाठी असलेला दीपावलीचा मुहर्त साधण्यासाठी नेहमीप्रमाणे ग्राहकांना सोन्याची नाणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारख्या भेटवस्तूंबरोबरच या दिवसांमधील बुकिंगसाठी प्रति चौरस फूट ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतची सवलत देऊ केली आहे.  मुंबई आणि लगतच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर या महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी छोटय़ा मोठय़ा आकाराचे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत आणि आता आणखी नवीन प्रकल्पांची घोषणा होत आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षांत घरांची बाजारपेठ तशी थंड राहिली. मागील वर्षी म्हणजेच २०११ मध्ये ‘अक्षय्य तृतीया’, दसरा, दिवाळीचा पाडवा हे गृहखरेदीचे मुहूर्त मागणीअभावी फारसे शुभ गेले नव्हते. यंदा २०१२ चा गुढीपाडवा व मागच्याच महिन्यात गेलेला दसरा असे घरखरेदीसाठीचे मुहूर्तही बिल्डरांसाठी अपेक्षेइतके शुभ ठरले नाहीत. या सर्वामुळे महानगर प्रदेशात सुमारे एक लाख घरे विक्रीविना पडून असल्याचे वारंवार सर्वेक्षणात समोर आले. आता गृहकर्जावरील व्याजदरात बऱ्यापैकी कपात झाल्याने बिल्डरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी तरी आपल्याला शुभ ठरावी यासाठी बिल्डरमंडळींनी कंबर कसली आहे. वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेल्वेस्थानकांवरील आणि बाहेरील फलक हे गृहप्रकल्प आणि सवलतींच्या जाहिरातींनी ओसंडून वाहत आहेत.
घरखरेदीवरील सेवाकर आणि विक्रीकराचा बोजा हलका व्हावा यासाठी घराची नोंदणी करणाऱ्यांना सरकार दरबारी लागणारे नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्याचे काही बिल्डरांनी जाहीर केले आहे. तर एलईडी, वॉशिंग मशीन, ‘डबल डोअर फ्रीज’, इलेक्ट्रिानिक चिमणी यासारख्या गृहपयोगी वस्तूंचे ‘लाखमोला’चे पॅकेज घरासोबत काहींनी देऊ केले आहे. तर काही प्रकल्पांनी गृहिणीला हव्याहव्याशा वाटणाऱ्या ‘मॉडय़ुलर किचन’ची भेट देऊ केली आहे. तर काही मोठय़ा बिल्डरांनी आपल्या प्रकल्पांच्या स्वरूपानुसार प्रति चौरस फूट ५० ते ५०० रुपयांची सवलतही जाहीर केली आहे. छोटय़ा आणि माफक दरातील घरांच्या प्रकल्पांसाठी ५० ते १०० रुपयांपर्यंतच्या सवलती आहेत.           

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2012 10:37 am

Web Title: builders diwali gift to customers
टॅग Builders,Diwali
Next Stories
1 ‘येडा’ चित्रपटाद्वारे आशुतोष राणा करणार मराठीत पदार्पण
2 १८ वर्षांपूर्वीच्या कार्पेट घोटाळ्यातील एअर इंडियाचा अधिकारी निर्दोष
3 वर्षां उसगावकरचे ‘पुढचे पाऊल’
Just Now!
X