तळमजल्यावरील सदनिकेत रहिवाशाने केलेले बदल तसेच छतावरील बागेमुळे नौपाडा परिसरातील एका इमारतीला धोका निर्माण झाला असून यासंदर्भात सोसायटीने केलेल्या तक्रारीकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे. नौपाडय़ात मल्हार सिनेमागृहासमोर स्मृती विनायक गृहनिर्माण सोसायटी ही दोन मजली इमारत आहे. या इमारतीत तळमजल्यावर राहणाऱ्या गृहस्थांनी त्यांच्या सदनिकेत महापालिकेची अथवा सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता बदल केले आहेत. ते स्वत: सध्या या इमारतीत राहत नसून त्यांनी ही सदनिका भाडय़ाने दिली आहे. मात्र मूळ आराखडय़ात त्यांनी केलेल्या या लुडबुडीमुळे इमारतीला तडे गेले आहेत. पहिल्या मजल्यावरील रहिवाशांच्या घरातील भितींना त्यामुळे मोठय़ा प्रमाणात ओल येते. घरात कोणतेही फर्निचर टिकत नाही. छतावरील बागेमुळेही इमारतीवर अतिरिक्त भार पडत असल्याचे स्थापत्य स्थिती अहवालात (स्ट्रक्चरल ऑडिट) स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या अहवालात इमारतीची तातडीने दुरुस्ती करून घेण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
यासंदर्भात सोसायटीचे अध्यक्ष मिनेष गडकरी गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ महापालिकेकडे पत्र व्यवहार करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही, अशी माहिती त्यांनी दिली.