कांद्याचे भाव आकाशाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. कांद्याचे चढे भाव, राजकारण, समाजकारण व स्वयंपाकघरात ऐरणीवरचा विषय ठरला आहे. कांद्याचे चढे भाव व यंदाचा भरपूर पाऊस यामुळे पश्चिम विदर्भासह बुलढाणा जिल्ह्य़ात कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कांद्याच्या उत्पादनातून चांगभले होईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. जिल्ह्य़ातील अन्य रब्बी पिकांपेक्षा कांद्याला शेतकरी प्राधान्य देत असल्याने कांदे बियाण्यांच्या भावातही लक्षणीय वाढ झाली आहे.
जिल्ह्य़ात यापूर्वी मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगाव, जळगाव जामोद, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर या तालुक्यांतील सिंचनाचे प्रमाण अधिक असलेल्या भागातच कांद्याची लागवड व्हायची. कांद्याचे भाव त्या वेळी साधारण असल्याने शेतकरी कांद्याला फारसे प्राधान्य देत नसत. मात्र, यावर्षी कांद्याच्या भावाने शंभरी गाठत उच्चांक केला आहे. कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. चढे भाव व मुबलक पावसामुळे पश्चिम विदर्भासह जिल्ह्य़ातील शेतकरी रब्बी पीक म्हणून कांदा लागवडीकडे वळला आहे. कांद्याचे भाव असेच राहिल्यास हेक्टरी लाखोच्या कांद्याचे उत्पादन होईल, असा शेतकऱ्यांचा कयास आहे. कांद्याच्या लागवडीत प्रचंड वाढ झाल्यास पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा व वाशिम या नाशिकसारख्या बाजारपेठा होऊ शकतात, असे चिखली तालुक्यातील पेनसावंगीचे कांदा उत्पादक शेतकरी समाधान तेजराव शेजोळ यांनी सांगितले.
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील शेतकरी शेख हनीफ बागवान हे कांद्याच्या बियाण्यांचे व लागवडीच्या कांद्याचे विक्रेते आहेत. कांदा बियाणे व लागवडीच्या कांद्याला सध्या भरपूर मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या धर्तीवर लाल-पांढऱ्या रंगाचा बसवंत ७८०, एन-२-४-१, एन २५७-९-१, फुले सुवर्णा, अर्का प्रगती, अशा विविध जातींचा कांदा उपलब्ध आहे. लागवडीच्या कांद्याचे भाव ७०० ते ३००० रुपये क्विंटलपर्यंत आहेत.
पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्य़ांत रब्बी हंगामात ५० ते ७५ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. यंदा पाऊस व हवामानही कांदा उत्पादनाला पोषक आहे. त्यामुळे हेक्टरी उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने कांद्याची लागवड केल्यास त्यांना निश्चित फायदा होऊ शकतो, असे बुलढाणा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश भराड यांनी सांगितले. जिल्ह्य़ात कांद्याला पोषक वातावरण आहे. मात्र, कांदाचाळींची संख्या कमी आहे. मध्यंतरीच्या काळात नांदुरा व मलकापूर बाजार समित्यांनी राज्य पणन मंडळाच्या सहकार्याने कांदाचाळी बांधकामाची योजना राबविली होती. मात्र, पुढे ती थंडबस्त्यात पडली. सुधारित पद्धतीने कांदा लागवडीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून दिले जात नसल्याची खंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.