आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅंकेला संजीवनी देण्याच्या प्रश्नावरून हिवाळ्याच्या बोचऱ्या कडक थंडीत जिल्ह्य़ातील राजकारणाने चांगलाच पेट घेतला आहे. मात्र, या भडकलेल्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू सिंदखेडराजाचे नाराजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हे झाले आहेत.
कोटय़वधी रुपयांच्या तोटय़ात असलेली, दिवाळखोरीच्या शेवटच्या टप्प्यात असलेली जिल्हा बॅंक शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे. राज्य शासनाने आर्थिक डबघाईस आलेल्या उस्मानाबाद, जालना, धुळे-नंदूरबार या जिल्हा बॅंकांना मदत केल्यानंतर या बॅंकांच्या परवान्याचे नूतनीकरण झाले आहे. मात्र, कॉंग्रेस आघाडीच्या सरकारने अशा आवश्यक मदतीपासून बुलढाणा जिल्हा बॅंकेला ताटकळतच ठेवले आहे. वेळेवर मदत मिळत नाही म्हणून दोन महिन्यापूर्वी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे व त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने पदांचे राजीनामे दिले. त्यानंतर बॅंकेवर जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधकांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय मंडळ विराजमान झाले. जिल्हा बॅंकेच्या पुनर्वसनाचा चेंडू राज्य शासनाच्या मैदानात टोलवल्यानंतर राज्य शासन जिल्हा बॅंकेचे तारणहार होईल. त्यानंतर सहा महिन्यात जिल्हा बॅंक ताळ्यावर येईल, आणि त्यानंतर सहा महिन्यात निवडणुका होतील आणि परत आपण बॅंक ताब्यात घेऊ. अशी स्वप्ने डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पाहिली.
डॉ.शिंगणे यांना जिल्हा बॅंक कितपत समजली-उमजली त्यापेक्षा सर्वाधिक त्यांचा जीव या बॅंकेत अडकलेला असल्याने त्यांना ती साहजिक अपेक्षा होती. मात्र, राज्य शासन या बॅंकेकडे ढुंकूनही पहायला तयार नाही. जिल्हा बॅंकेचे प्रकरण थकित कर्ज वसुलीवर निपटण्याचा प्रयत्न करा, असे या बॅंकेला कॉंग्रेस आघाडी सरकारने निक्षून सांगितले आहे. त्यामुळे अखेर जिल्हा बॅंकेसाठी डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविला आहे. तो अद्याप मंजूर झाला नाही किंवा मंजूर होण्याची शक्यता नाही. मात्र, या राजीनाम्यावरून जिल्हाभर डॉ.श्िंागणे समर्थक व विरोधकांमध्ये आंदोलनाची ठिणगी पडून त्याचा आगडोंब होऊ लागला आहे. शिंगणे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घालण्यात आला. शिंगणेंना कॉंग्रेस आमदार सानंदा नेहमीच विरोध करतात. त्यांच्यामुळे बॅंकेच्या मदतीस विलंब होत आहे, असा आरोप शिंगणेंनी केल्यामुळे राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेतील आपला पाठिंबा मागे घेण्याची धमकी कॉंग्रेसला दिली आहे.
जिल्हा परिषदेत कॉंग्रेस राष्ट्रवादीचे युती आहे व सानंदा समर्थक कॉंग्रेसच्या वर्षांताई वनारे अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादीने अशी भूमिका घेतल्यानंतर कॉंग्रेसचे आमदार दिलीप सानंदा हेही शिंगणेंविरोधात भडकले आहेत. त्यांनी शिंगणेंना हिंमत असेल तर राजीनामा मंजूर करून घ्या, असे आव्हान दिले आहे. जिल्हा बॅंक प्रश्नावरून डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात आंदोलन चालविणाऱ्या डॉ.राजेंद्र गोडे व दिलीप सानंदा यांचा निषेध शिंगणे समर्थकांनी केल्यानंतर डॉ. गोडे यांनीही शिंगणे यांना आडवे घेतले आहे.
बॅंक बुडण्यास व बॅंकेच्या दोनशे नऊ कोटी रुपयांच्या थकित कर्जासाठी शिंगणे जबाबदार आहेत. बॅंकेच्या हिताची भूमिका घेणाऱ्यांचा निषेध करून हा प्रश्न सुटणार नाही,   असा   टोला डॉ.गोडे यांनी शिंगणे यांना लगावला आहे. या सगळ्या राजकीय सुंदोपसुंदीत जिल्हा बॅंकेचे खरोखर काय होणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहू लागला आहे.