अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेडच्या संरक्षित क्षेत्रात मोठे बंकर खोदण्यात आले असून, या बंकरमधून घातपाती कारवाया होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून या ठिकाणी मोठमोठे बंकर खोदण्यात येत आहेत, तरीही वनखात्याला याचा सुगावा नाही. त्यामुळे वनखात्याच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परिसरातच बिबट आणि इतरही वन्यजीवांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांच्या शिकारीचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही.
छत्री तलावाजवळील मंदिर आणि दग्र्याच्या बाजूने बंदरझिऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला तीन बाय दहा फुटाचे मोठे बंकर खोदण्यात आले आहे. तब्बल १५ लोक आरामात बसू शकतील, एवढे खोल गुहेसारखे हे बंकर आहे. चार-पाच वर्षांंपासून हा प्रकार सुरू असताना आणि वनखात्याच्या गस्तीचा हा परिसर असतानासुद्धा याकडे दुर्लक्ष कसे, हा चर्चेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे, काही स्वयंसेवींनीच ही बाब वनखात्याच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर महत्प्रयासाने वन कर्मचाऱ्यांनी दगड भरून ते बंकर बुजवले. त्यानंतर चार-पाच वेळा हा प्रकार घडून आला आणि आता पुन्हा त्याच ठिकाणी मोठे बंकर खोदण्यात आले. त्यामुळे वनखात्याच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साळींदरचे एकमेव असलेले घरटे उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी बंकर खोदण्यात आले. येथील बाजूच्याच झाडावर पोपटांची बरीच घरटी आहेत. वाशीम आणि अमरावती जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर पोपटांची तस्करी केली जाते. त्यामुळे या बंकरमधूनच या कारवाया होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मोरांचा अधिवास याच परिसरात असून, त्यांची घरटीही आहेत. हरीण, नीलगायींचा कायम वावर या परिसरात असतो आणि बिबटय़ाचे अस्तित्वसुद्धा या ठिकाणी आहे. बिबटय़ाच्या पाऊलखुणांसह चार दिवसांपूर्वीच बंकरसमोरच हरणाची शिकार आढळून आली. यात हरणाचे शीर आणि धड गायब होते.
गेल्या दोन वर्षांत बंकरचा हा प्रकार वाढूनही वनखात्याने कोणतीही कारवाई का केली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. वन कर्मचारी खरोखरीच गस्तीवर जातात का, हाही एक संशोधनाचा विषय आहे. दिवसा या परिसरात कोणतीही हालचाल दिसत नाही, पण रात्री हालचालींना वेग येतो. बिर्याणीच्या रूपाने याचे पुरावेसुद्धा या परिसरात सापडले आहेत. काही फोटो आणि झेंडे लावून धार्मिकतेचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही, त्यासाठी एवढे खोल बंकर खोदण्याची गरज काय, हा मुद्दा आहे. या ठिकाणी एकतर शिकार होत असावी नाही, तर घातपाती कारवायांचे केंद्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढा गंभीर प्रकार घडूनही वनखात्याची ‘अळीमिळी गुपचिळी’ ही भूमिका संशयास्पद ठरली आहे. यासंदर्भात उपवनसंरक्षक निलू सोमराज यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही आताच जाऊन या प्रकाराची पाहणी आणि चौकशी करू, असे त्यांनी सांगितले.