दफ्तरांच्या ओझ्य़ामुळे सुमारे ३० टक्के मुलांमध्ये पाठीचा कणा कायमचा दुखावण्याचा धक्कादायक निष्कर्ष एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या अभ्यासातून समोर आला. मात्र, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निष्कर्ष धुडकावून लावला आहे. विशेष म्हणजे मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे हा अहवाल सोपविण्यात आल्यानंतर, त्यांनीही तो मंडळाकडे सोपवण्याव्यतिरिक्त कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे हा अहवाल आता थेट पंतप्रधानांकडे पाठवण्यात आला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील नर्सरी ते केजी-२ पर्यंतच्या मुलांना गृहपाठ आणि शाळेचे दफ्तर असू नये, असे मंडळाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अधिकांश शाळांमध्ये मंडळाच्या या आदेशाला हुलकावणी देण्यात आली आहे. मुलांच्या वजनाच्या दहा टक्के वजन दफ्तराचे असावे लागते, पण हे वजन २० टक्क्यांपर्यंत असल्याचे सेवानिवृत्त प्रा. राजेंद्र दाणी यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. भारतीय वैद्यक संस्थेनेही दफ्तरांच्या ओझ्य़ामुळे खांदे, पाठीचे स्नायू, मणका, गुडघे दुखावण्याचा धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. मंडळाने हे दोन्ही अभ्यास धुडकावून लावले असून कोणत्याही शाळेकडून दफ्तरांच्या ओझ्य़ामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचा अहवाल नसल्याचे स्पष्टीकरण या अहवालावर दिले आहे.
दफ्तरांच्या ओझ्य़ावरील मुद्दय़ावरून राज्य शिक्षण मंडळ आणि केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाची पाहणी होणे आणि ओझे वाढू नये म्हणून काय काळजी घेता येईल, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. शाळांमध्ये पुस्तकांसाठी लॉकर असणे गरजेचे नाही, तर पुस्तके उपलब्ध असणे अधिक गरजेचे आहे. तीन चतुर्थाश पुस्तके घरी आणि एक चतुर्थाश पुस्तके शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बाळगता आली पाहिजे, असे प्रा. दाणी म्हणाले. यासंदर्भात मानव संसाधन विकास मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंडळाकडून दफ्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळेच १३ जानेवारीला हा संपूर्ण अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आला आहे, असेही प्रा. दाणी यांनी सांगितले.

अभ्यास काय म्हणतो?
दफ्तरांच्या ओझ्य़ामुळे तात्काळ परिणाम जाणवत नसला तरी तारुण्यात पदार्पण केल्यानंतर याचे परिणाम जाणवायला लागतात. पुस्तकांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त सादरीकरणांमुळे पानांची संख्या आणि परिणामी वजन वाढते. ई-लर्निग हा दफ्तरांच्या ओझ्य़ावरील पर्याय होऊ शकत नाही, उलट यामुळे मुलांवरील ताण वाढण्याची अधिक शक्यता आहे. तुलनेने राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके वजनाने हलकी असली तरी अतिरिक्त स्वाध्याय पुस्तकांमुळे या मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे दफ्तरसुद्धा जड झाले आहे.

दफ्तरांच्या ओझ्य़ावरील पर्याय
अभ्यासक्रम चार भागात विभाजीत करून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची पुस्तके ‘स्पायरल बाईंडिंग’च्या स्वरूपात आणि १५०-१७५ ग्रॅम त्याचे वजन असावे. वह्य़ा १०० पानांच्या आणि चारच असाव्यात. यामुळे दफ्तरांचे वजन कमी करता येऊ शकते.