शहरात घरफोडी व चोरीचे सत्र अद्याप सुरूच असून वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरटय़ांनी लाखोंचा ऐवज लंपास केला.  या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंचवटीतील गुरू गोविंदसिंग सोसायटीत भरदुपारी चोरीची घटना घडली. जसविंदरसिंग हरविंदरसिंग यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ाने ६५ हजाराची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ५३ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना रासबिहारी स्कूलजवळील वृंदावन कॉलनीत घडली. गौरव सुधीर जगताप व त्यांचे सहकारी गरीबदास संपत साळवे हे कामानिमित्त बाहेर गेले असताना रो हाऊसचा मागील दरवाजा उचकटून चोरटय़ांनी हजारो रूपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडय़ांप्रमाणे चोरीचे सत्रही सुरू आहे. भद्रकातीतील एका बँकेजवळ उभ्या असलेल्या मोटारीतून एक लाख २० हजार रूपयांची रोकड व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरटय़ाने लंपास केली. या प्रकरणी रेजीबाई सुनीलकुमार यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पंडित कॉलनीत एका खासगी क्लाससमोरून सुझुकी मोटारसायकल तर रविवार पेठ परिसरातून अ‍ॅक्टीव्हा मोटारसायकल चोरटय़ाने चोरून नेली. या प्रकरणी अनुक्रमे रवींद्र गंगोदर व अजित बागमार यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.