जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील सिटी हॉस्पिटलमध्ये बर्न केअर युनिट उभारण्यात आले असून या नव्या युनियचे उद्घाटन येत्या रविवारी,२८ जुलै रोजी सकाळी १०. ३० वाजता आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
सोलापूर हे वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जात असले तरी या शहरात भाजलेल्या रूग्णांसाठी वैद्यकीय उपचारासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध नाही. छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयातील बर्न युनिट हाच एकमेव आधार आहे. परंतु या विभागालाही मर्यादा आहेत. भाजलेल्या रुग्णांवरील उपचाराचा खर्च महागडा असून यात पुन्हा रूग्णांचे प्राण वाचण्याची शाश्वती नसते. त्यामुळे काही तज्ज्ञ डॉक्टरांनी बर्न केअर युनिट सुरू केले होते. परंतु ते यशस्वी झाले नाही. प्राप्त परिस्थितीत भाजलेल्या रूग्णांना एक तर शासकीय रुग्णालयात किंवा लातूर व औरंगाबाद येथे जावे लागते. तथापि, तज्ज्ञ डॉ. गुणवंत चिमणचिवडे यांच्या पुढाकाराने सिटी हॉस्पिटलमध्ये बर्न केअर युनिटची उभारणी करण्यात आली आहे. यासंदर्भात एका पत्रकार परिषदेत डॉ. चिमणचिवडे यांनी स्वत: माहिती दिली. या वातानुकूलित तथा र्निजतूक अशा सहा खाटांच्या विभागात भाजलेल्या रुग्णांना कमीतकमी संसर्ग व्हावा व तो रूग्ण अधिकाधिक लवकर बरा व्हावा यासाठी अद्ययावत यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे डॉ. चिमणचिवडे यांनी सांगितले. या बर्न केअर युनिटच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ बांधकाम उद्योजक अनिल पंधे व रोहिणी पंधे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.