06 July 2020

News Flash

कराडमध्ये जाळपोळ, महामार्ग रोखला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेले तीन आठवडे सुरू असलेल्या ऊसदरवाढ आंदोलनाचा आज भडका उडाला. ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याचे चित्र होते.

| November 28, 2013 01:54 am

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेले तीन आठवडे सुरू असलेल्या ऊसदरवाढ आंदोलनाचा आज भडका उडाला. ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याचे चित्र होते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी काल मंगळवारी झालेल्या बैठकीत रोखठोक भूमिकेऐवजी ऊसदर ठरविण्यासाठी समितीचा उतारा देण्यात आल्याने ठिकठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आज सायंकाळी  पुणे-बेंगलोर महामार्गावरील पाचवड फाटा येथे दोन टेम्पो व चार ट्रक पेटवण्याचा आंदोलकांनी केलेला प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे निष्फळ ठरला. तर, दोन अडीचशे वाहने दगडफेकीचे लक्ष्य झाल्याने कराडहून कोल्हापूरकडे जाणारा महामार्ग जवळपास तीन तास ठप्प राहिला. या प्रकरणी तत्काळ २३ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांचा समावेश नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
काल रात्रीच कराडनजीकच्या कार्वे, कालेटेक, विंग, चचेगाव, ओगलेवाडी आदी ठिकाणी संतप्त ऊसउत्पादकांनी टायर पेटवून तसेच, एसटी बसेस व खासगी वाहनांवर दगडफेक करून, सर्वत्र वाहतूक ठप्प केली. त्यामुळे कालची रात्र पोलिसांनी रस्त्यावर घालवताना, उद्याचे काय? अशी विवंचना केली. तर, आज कराड तालुक्याच्या ग्रामीण भागात शासनाचे श्राद्ध घालताना, दोन अडीचशे वाहनांवर तुफान दगडफेक करून वाहतूक ठप्प करताना, सर्वत्र तणावाचे वातावरण पसरवण्याची किमया ऊस उत्पादकांनी केली. पंतप्रधानांच्या भेटीला गेलेले खासदार राजू शेट्टी आज कराडनजीकच्या पाचवडेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी दाखल झाले. शेट्टींचे आगमन होणार असल्याने विशेषत: कोल्हापूर पाठोपाठ सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातूनही हजारो शेतकरी डेरेदाखल झाले. आंदोलकांच्या भोजनासाठी ऊसळ, थालपीठ, पिठलं भाकरी, भुईमुगाच्या शेंगांची पोती आणि गुळाच्या भेल्या आल्या होत्या. आंदोलकांनी या अस्सल ग्रामीण भोजनावर ताव मारून आपल्या तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या घोषणांना जोर दिला. ठिय्या आंदोलकांसमोरील राज्यकर्ते व साखर कारखानदारांचा समाचार घेणारे सदाभाऊ खोत यांचे आक्रमक भाषण आटोपल्यानंतर राजू शेट्टी यांचे भाषण दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झाले. राजू शेट्टी यांनी काल पंतप्रधान भेटीला गेलेल्या एकंदर प्रवासाचा व त्यातील घडामोडींचा आढावा दिला. शेट्टींच्या भाषणाच्या मध्यंतरी शरद पवार यांची प्रतिकात्मक तिरडी आंदोलनस्थळी आणून त्यास फटके देण्याचा प्रकार मोठय़ा घोषणाबाजीत करण्यात आला. आपण मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला कुठेही आडकाठी आणली नाही. मात्र, आपण मागितलेल्या तीन हजार रुपयांच्या उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी आग्रही राहिल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन पेटवू नका, लवकरात लवकर निर्णय घ्या. अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटत असल्याचे राजू शेट्टी संबंधितांना बजावत असतानाच दुसरीकडे शेकडो ऊस उत्पादकांनी तोडफोडीचे आंदोलन लक्ष्य केले. आंदोलनस्थळानजीक असलेल्या पाचवड फाटय़ावर महामार्गाकडेच्या उसातून दगडफेक करण्यात आली. काही आंदोलकांनी थेट वाहने आडवून ती पेटवण्याचा प्रयत्न केला. अशी सुमारे अर्धा डझन वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून पोलिसांनी बचावली. मात्र, अडीचशेवर वाहनांचे दगडफेकीत नुकसान झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रित ठेवण्यात यश मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2013 1:54 am

Web Title: burning in karad national highway stop
Next Stories
1 ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेची साखर पट्टय़ात २ दिवस बंदची हाक
2 सीमाभागातील ऊस उत्पादकाची बेळगाव विधानसभेसमोर आत्महत्या
3 कोल्हापूरची पुण्या-मुंबईकडची वाहतूक ठप्प
Just Now!
X