नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने गेले चार दिवस घेण्यात आलेल्या एमआयडीसी प्रवासी सर्वेक्षणास कामगारांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. एमआयडीसी भागात प्रवासी बस हव्यात, या मागणीचा एनएमएमटीने गांर्भीयाने विचार सुरू केला असून लवकरच उपक्रमाच्या ताफ्यात येणाऱ्या दहा मिनी बस या मार्गावर वळविण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी एनएमएमटीने १५ ते १८ जानेवारी दरम्यान एका सर्वेक्षणाद्वारे प्रवाशांची मते जाणून घेतली. त्यामुळे या भागात असणारी रिक्षा चालकांची मक्तेदारी मोडीत निघणार आहे. प्रवाशांच्या असहायतेचा फायदा घेऊन रिक्षाचालक कामगारांची अक्षरश: लूटमार करीत असल्याचे दिसून येते.
अशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई एमआयडीसीत अनेक समस्या आहेत. त्यामुळे रस्ते, पाणी, गटारे, डेब्रिज यांसारख्या समस्यांनी येथील उद्योजक नेहमी नवी मुंबई पालिकेच्या नावाने बोटे मोडत असतात. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाने अंर्तगत मार्गावर बस सुरूकरण्याचा विचार केला आहे. त्यामुळे येथील लाखो कामगारांना सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. एमआयडीसी भागातील मुख्य रस्ता वगळता अंर्तगत भागात कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे छोटया कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना अनेक मैल पायपीट करावी लागते. त्यानंतर मिळणाऱ्या बसमधील तोबा गर्दी बघून जीव मेटाकुटीला येतो. त्यामुळे नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उप्रक्रमातर्फे कोपरखैरणे, रबाले, घणसोली या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी सह्य़ांची मोहिम सुरू झाल्यानंतर प्रवाशांना आशा वाटू लागली. चार दिवसांत अडीच हजार प्रवाशांनी स्वाक्षऱ्या करून या उपक्रमास अनुमोदन दिले. यापेक्षा कितीतरी जास्त प्रवाशांनी या मार्गावर मिनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
परिवहन उपक्रमात दहा नवीन मिनी बस येणार आहेत. एमआयडीसी भागात कामगारांसाठी मिनी बस सुरू व्हाव्यात अशी मागणी होती. त्यामुळे एनएनएमटीने चार दिवस सर्वेक्षण केले असून त्यांचा अहवाल प्रशासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर एमआयडीसीच्या कोणत्या भागात बसेस सुरू करायच्या त्याचा विचार केला जाणार असल्याचे आगार व्यवस्थापक पंडित तांडेल यांना सांगितले. या सर्वेक्षणामुळे कुठे किती प्रवासी उपलब्ध होतील त्याची माहिती हाती आल्याचे सांगितले.

एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेकमार्गे बस हवी
एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक व त्या परिसरात सध्या अनेक नवीन कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे ‘एमबीपी’ वगळता या ठिकाणी स्वतंत्र बससेवा उपलब्ध करून देण्याचे एमएमएमटीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये निदर्शनास आले आहे.  त्यामुळे इलेक्ट्रॉनिक झोन (ईएल) च्या अंतर्गत भागामध्ये ही बस एल अ‍ॅण्ड टी, अभिषेक हॉटेल,  सनोफी, मायक्रोटेकमार्गे घणसोली रेल्वे स्थानकाकडे नेल्यास या परिसरात असणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची चांगलीच सोय होणार आहे. सध्या येथे येण्यासाठी खासगी वाहन अथवा रिक्षा हाच पर्याय असल्याने येथे एनएमएमटीने रिंग रूट पद्धतीने मिनी बससेवा सुरू केल्यास त्याचा प्रवाशांना फायदा होईल.