News Flash

‘कोहिनूर मॉल’समोरचा बसस्टॉप हलवला, पण मनसेने नाही पाहिला!

शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी आपल्या उद्योग साम्राज्याचे नाव ‘कोहिनूर’च का ठेवले ते सांगणे कठीण असले तरी या नावाने त्यांना कायमच साथ आणि यश दिले

| January 30, 2013 12:48 pm

शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी आपल्या उद्योग साम्राज्याचे नाव ‘कोहिनूर’च का ठेवले ते सांगणे कठीण असले तरी या नावाने त्यांना कायमच साथ आणि यश दिले हे वास्तव आहे. ‘कोहिनूर’च्या मार्गातील कोणताही अडथळा मनोहरपंतांनी आजवर सहजी हटवला आहे. त्याचाच कित्ता त्यांचे चिरंजीव उन्मेशही गिरवत आहेत. शिवसेना भवनासमोर उभ्या राहत असलेल्या पन्नास मजल्यांच्या ‘कोहिनूर स्क्वेअर’ मॉलच्या मार्गात ‘बेस्ट’चा एक बसथांबा येत होता. अचानक कोणताही विरोध न होता हा थांबा मॉलच्या प्रवेशद्वारापासून दीडशे फुटांवर सरकवण्यात आला. मजेची गोष्ट म्हणजे सेनेच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या मनसेला हा बसथांबा हलविल्याचे दिसले नाही. मुंबईच्या पश्चिम उपनगरातून येणाऱ्या बेस्टच्या बसेससाठी शिवसेना भवनासमोरचा बसथांबा महत्त्वाचा. ‘एक सेनाभवन’ असे रुबाबात तिकीट मागणाऱ्या बेस्टच्या ग्राहकांना यापुढे ‘एक कॉटन किंग’ असे तिकीट बसवाहकाकडे मागावे लागणार आहे. दादरमध्ये विधानसभेची जागा सेनेकडून हिसकावून घेतल्यानंतर महापालिका निवडणुकीत येथील नगरसेवकांच्या सातही जागी मनसे विजयी झाली. तेव्हापासून सेनेचा बालेकिल्ला पुन्हा हस्तगत करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. तर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर मनसे लक्ष ठेवून आहे. या पाश्र्वभूमीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’समोरचा बसस्टॉप रातोरात हलविण्यात आला तरी तो मात्र मनसेच्या दृष्टीस कसा पडला नाही, असा सवाल स्थानिक नागरिकांकडूनच उपस्थित होत आहे. गेल्या आठवडय़ात  प्रभाग समितीच्या बैठकीत अपक्ष नगरसेवकाने बसस्टॉप हलविल्याचा विषय उपस्थित केला. मात्र सेना-मनसेच्या नगरसेवकांनी त्याला फारशी दाद लागू दिली नाही. मनसेचे स्थानिक नगरसेवक मनिष चव्हाण यांनीही याप्रकरणी मौन धारण केले आहे. ‘कोहिनूर’च्या सूत्रांच्या म्हण्यानुसार मॉलच्या प्रवेशद्वारासमोर हा बस थांबा येत असल्यामुळे सात महिन्यांपूर्वी तो हटविण्याबाबत बेस्टकडे अर्ज केला होता. त्यानुसार बेस्टनेच हा थांबा हलवला आहे. स्थानिक नागरिक त्यास उघड विरोध करू शकत नाहीत.
काही वर्षांपूर्वी सिद्धिविनायक मंदिरासमोर एक हॉटेल बांधण्यात येत होते. तेव्हा त्याच्या समोरच्या रस्त्यावर पालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह होते. तारांकित हॉटेलसमोर स्वच्छतागृह असून कसे चालणार? तेव्हा त्या स्वच्छतागृहाचे तोंड फिरवण्यात आले होते. ‘कोहिनूर स्क्वेअर’साठी तर फक्त बसस्टॉप दीड-दोनशे फूट हलवला गेला. त्यात काय विशेष!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:48 pm

Web Title: bus stop trancfer wich was out side kohinoor but mns not see that
टॅग : Bus Stop,Mns
Next Stories
1 बिल्डरांसाठी राजकारण्यांचा ‘उंदीर -मांजरा’चा डाव
2 ‘रिश्ता वही, सोच नई’ने जिंकले रसिकांना
3 स्वसंरक्षणाचा चाकू ‘किचन’मध्ये, तिखट फोडणीत..
Just Now!
X