उद्या, गुरुवारी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा या चार विभागामध्ये निवडणुकीच्या कामासाठी १ हजार १०० बसेसची व्यवस्था केली आहे. यामुळे महामंडळाला फार मोठा आर्थिक लाभ होणार आहे. एसटी महामंडळ हा शासनाचा उपक्रम असल्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी महामंडळाच्या बसेसची नोंदणी करण्यात येते. लोकसभा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनची ने-आण तसेच कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची नोंदणी केली आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा या चार विभागा मिळून मंगळवारी सायंकाळपर्यंत एसटी महामंडळाच्या प्रादेशिक विभागात एकूण १ हजार १०० एसटी बसेसची नोंदणी केली. काही ठिकाणी मंगळवारी सायंकाळनंतर मतदान केंद्रावर एव्हीएम यंत्रे पोहोचवण्यात आली, तर काही मतदान केंद्रावर बुधवारी सकाळीच यंत्रे पोहोचवण्यात आली. बुधवारी दिवसभर मतदान केंद्रावरील यंत्रांची पुन्हा चाचणी घेण्यात आली. बिघाड असलेले यंत्रे परत पाठवून तालुका स्तरावरून दुसरे यंत्र बोलावण्यात आले. काही मतदान केंद्रावर अतिरिक्त एव्हीएम यंत्र ठेवण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदारांना सोयीचे होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर बुधवारपासूनच पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राचा कानोसा गुप्तचर खात्यामार्फत घेतला जात आहे.