News Flash

दिनदर्शिकेत साकारले फुलपाखरांचे जग

भिंतीवर लटकवलेल्या दिनदर्शिकेत कोणत्या तारखेला कोणता वार, चांगल्या कामासाठी कोणता दिवस शुभ किंवा मुहूर्त कधी एवढय़ापुरतेच दिनदर्शिकेचे स्वरूप राहिलेले नाही.

| January 2, 2015 12:43 pm

भिंतीवर लटकवलेल्या दिनदर्शिकेत कोणत्या तारखेला कोणता वार, चांगल्या कामासाठी कोणता दिवस शुभ किंवा मुहूर्त कधी एवढय़ापुरतेच दिनदर्शिकेचे स्वरूप राहिलेले नाही. तर त्यातून माहितीपूर्ण काय देता येईल, याकडेही दिनदर्शिका निर्मात्याचा कल असतो. अशाच दिनदर्शिकेची सुरुवात गेल्यावर्षीपासून विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी प्रेमाचे बीज रोवणाऱ्या अकोला येथील निसर्गकट्टा या समूहाने केली आहे. गतवर्षी पक्षीजगत तर यंदा फुलपाखरांच्या जगताची माहितीपूर्ण ओळख त्यांनी दिनदर्शिकेच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
जैवविविधतेने समृद्ध भारतात अनेक प्रकारचे पशु-पक्षी, वनस्पती आणि कीटकही आढळतात. कीटकांच्या या जगतात फुलपाखरू हा सर्वाच्याच आवडीचा आणि आकर्षणाचा विषय आहे. त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व निसर्गाच्या या अनमोल घटकांची सर्वाना ओळख करून देण्यासाठी ‘निसर्गमित्र दिनदर्शिका २०१५’ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात सुमारे १५०० जातीची फुलपाखरे आढळतात. त्यांचे रंग, आकार, भिरभिरण्याच्या पद्धती, सवयी, अंडी देण्यासाठी निरनिराळ्या झाडांची निवड यातही वैविध्य आढळते. ‘सदर्न बर्डविंग’ या सर्वात मोठय़ा फुलपाखराच्या पंखाचा विस्तार १९० मिमी आणि ‘ग्रास ज्युवेल’ या सर्वात लहान फुलपाखराच्या पंखाचा विस्तार १५ मिमी आहे, हे या दिनदर्शिकेतूनच कळते. फुलपाखरू म्हणजे नेमके काय, उडतानाची आणि पंखांवरच्या रंगबदलाची प्रक्रिया कशी असते, फुलपाखराची निसर्गातली भूमिका काय, त्याचे निरीक्षण कुठे आणि कसे केले पाहिजे, फुलपाखरे आपल्या परिसरात यावी म्हणून काय करायला हवे आदी एकूणच फुलपाखरांच्या जगताची इत्यंभूत माहिती या दिनदर्शिकेतून मिळते.
गेल्या वर्षी पक्षीजगत दिनदर्शिकेत साकारले होते. एका पानावर तब्बल ११ पक्ष्यांची माहिती आणि एकूण सहा पानांवर ६६ पक्ष्यांचे जग दिनदर्शिकेत साकारले होते. यंदाच्या दिनदर्शिकेत दोन मोठी फुलपाखरे पहिल्या पानावर असे एकूण ५५ फुलपाखरांचे जग साकारले आहे. या दिनदर्शिकेसाठी अमोल सावंत यांच्यासह विशाल बनसोड, विजय पवार, गौरव झटाले, प्रेम अवचार आदींनी सहकार्य केले आहे. खास विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या या निसर्गमित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन अकोला वनखात्याचे उपवनसंरक्षक लोणकर, शारदा समाज संस्थेच्या अध्यक्ष अमरजा ढोमणे यांच्या उपस्थितीत अनिश पागृत, सुशांत सावंत, देवश्री दामोदरे या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
इंग्रजीत प्राणी, पक्षी, कीटकांच्या जगताविषयी सर्व माहिती उपलब्ध असते, पण मराठीतून ती उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांना या जगताची इत्यंभूत माहिती मिळत नाही.
निसर्गाच्या या घटकांविषयीच माहिती नसेल तर निसर्गाचे, पर्यावरणाचे संवर्धनही करता येणार नाही. निसर्गकट्टाचा मूळ उद्देशच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण करणे आहे. निसर्गप्रेमी विद्यार्थी घडविण्यासाठी आणि लोकांमध्येही निसर्गाच्या या घटकांच्या संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ही दिनदर्शिका हे एक माध्यम होऊ शकते. त्यामुळेच गेल्या वर्षीपासून दिनदर्शिकेचा हा उपक्रम सुरू केला आहे, असे निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 12:43 pm

Web Title: butterfly world on calendar
टॅग : Butterfly,Calendar
Next Stories
1 बनावट धनादेशाद्वारे वायुसेनेची दोन कोटींने फसवणूक
2 विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनातील ‘भाईभतिजा’ वाद
3 दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्यापासून ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा, लोकनृत्य समारोह
Just Now!
X