विद्यार्थिदशेपासून सुरू झालेल्या साहित्याच्या वाटचालीत गुरुजन व पालकांनी केलेल्या संस्कारांचा मोठा वाटा आहे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक बाबा भांड यांनी काढले.
साहित्य अकादमीतर्फे बालसाहित्यिक पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘स्व’विकास केंद्र व मंगलमूर्ती संस्कार केंद्रातर्फे भांड यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापकपदी निवड झाल्याबद्दल पी. एन. देशपांडे यांचाही गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बाबा भांड व आशा भांड यांचा सत्कार केंद्राचे संचालक श्रीकांत काशीकर, तर पी. एन. देशपांडे व अरुणा देशपांडे यांचा सत्कार मानसी काशीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कारानंतर देशपांडे म्हणाले, की एखाद्या चांगल्या कार्यास मदत करणे हे सोपे असते. परंतु ते चांगले कार्य स्वत: करणे व त्यात अनेक वर्षे सातत्य ठेवणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. काशीकर पती-पत्नी व त्यांचे सहकारी यांनी हे केले, ही गौरवपूर्ण बाब आहे. या वेळी देशपांडे व सिंधुमती वासुदेव पानसे यांनी ‘स्व’विकास केंद्रास प्रत्येकी ५ हजार रुपयांची देणगी दिली.
मयूरी पानसे हिने या वेळी भरतनाटय़म सादर केले. गणेशवंदना, पुष्पांजली, शिवस्तुती, वर्णम्, तिल्लाना अशा प्रकारांतून सादर केलेल्या भावमुद्रा व पदन्यासाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘स्व’विकास दिनदर्शिका २०१२-१३ वरील स्पर्धेचे पारितोषिक वितरण बाबा भांड व देशपांडे यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेतील पारितोषिक विजेते विद्यार्थी : पहिली ते चौथी गट – वैभवी गावंदे, सृष्टी थोरात, गिरीश सागर, आर्या कुंटे, राजकुमार सिदवाडकर, श्रावणी भालेकर, नेत्रा देशपांडे. पाचवी ते सातवी गट – प्रणम्य येळीकर, औंकार गुंजाळ, तन्वी रोपळकर, कन्हय्या कोठेकर, प्रचिती हसेगावकर, शर्वरी खामकर. आठवी ते दहावी गट – कोमल जोशी, अमोल बनकर, नेहा शिरुडे, श्रावणी कुलकर्णी, अमजत साहेबखाँ पठाण, राजश्री जाधव.