एरवी पर्यटकांच्या वर्दळीने गजबजून जाणाऱ्या भायखळ्याच्या जिजाबाई भोसले उद्यान-प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) ‘तो’ परिसर शांत होता.. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचीच हालचाल तेथे सुरू होती.. पण तीही कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने.. हा सर्व खटाटोप सुरू होता तो शिवासाठी.. तब्बल पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिवा पिंजऱ्यात सापडला आणि त्याची दिल्ली यात्रा सुरू झाली.. राणीच्या बागेतील कर्मचाऱ्यांना शिवाचे घडलेले तेच अखेरचे दर्शन.. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला खरा, पण तो निरोप अखेरचा असेल, असे तेव्हा कुणाला वाटलेही नव्हते. त्यामुळे आता शिवा कधीच दिसणार नाही, या जाणिवेने राणीची बाग सुन्न झाली आहे. राणीची बाग ही मुंबईतील पर्यटनस्थळांपैकी एक. येथे येणारे पर्यटक आणि मुंबईकरांना एकशिंगी गेंडय़ाचे दर्शन घडावे यासाठी पालिकेने देशातच नव्हे तर परदेशातही शोध सुरू केला. आसाम राज्य प्राणिसंग्रहालयात एक सहा वर्षांचा एकशिंगी गेंडा असल्याचे समजताच पत्रव्यवहार करण्यात आला आणि या गेंडय़ाचे मुंबईत येणे पक्के झाले. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ४ मार्च १९८५ रोजी हा गेंडा राणीच्या बागेत दाखल झाला. गेंडय़ाचे नाव शिवा ठेवण्यात आले आणि अल्पावधीतच शिवा पर्यटकांचे आकर्षण बनला. वयाच्या सहाव्या वर्षी मुंबईत आलेल्या शिवाचा तब्बल २८ वर्षे राणीच्या बागेत मुक्काम होता.
‘प्राणिसंग्रहालय मान्यता अधिनियम २००९’ अन्वये एकाकी प्राण्याला तातडीने जोडीदार उपलब्ध करणे बंधनकारक आहे. त्यानुसार  नवी दिल्ली येथील नॅशनल झूऑलॉजीकल पार्कमध्ये मादी गेंडा असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवाला तेथे पाठविण्याचा आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २८ फेब्रुवारी २०१३ रोजी दिला. अखेर शिवाच्या पाठवणीची तयारी सुरू झाली.
आवश्यक ते सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आणि शिवाला घेऊन जाण्यासाठी नॅशनल झूऑलॉजीकल पार्कमधील पशुवैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ कर्मचारी १८ ऑगस्ट २०१३ रोजी राणीच्या बागेत दाखल झाले. पिंजऱ्यात बंदीस्त करून शिवाला ट्रकने नवी दिल्ली येथे घेऊन जाण्याचा निर्णय झाला आणि सापळा रचण्यात आला.  पण शिवा पिंजऱ्याजवळ फिरकतही नव्हता. नॅशनल झूऑलॉजिकल पार्क आणि राणीच्या बागेतील वैद्यकीय अधिकारीही चक्रावले. तब्बल चार दिवस खाद्याकडे न फिरकलेला शिवा भूक सहन न झाल्यामुळे अखेर पाचव्या दिवशी पिंजऱ्यात आला. कर्मचाऱ्यांनी अलगद पिंजऱ्याचे दार बंद केले आणि शिवाचा दिल्ली प्रवास सुरू झाला. राणीच्या बागेतील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवाचे झालेले ते अखेरचे दर्शन. आता कर्करोगामुळे शिवा मृत्यू झाल्याचे कळताच राणीच्या बागेतील कर्मचाऱ्यांचे डोळे आसवांनी भरले.
जखमच शिवाच्या जीवावर बेतली..
आमचा आवाज जरी ऐकला तरी शिवा पाण्यातून उठून बाहेर यायचा.  आम्ही सकाळी ८ वाजता कामावर रुजू व्हायचो. पिंजऱ्यात उरलेले खाद्य आणि विष्ठा साफ करून झाल्यानंतर शिवाच्या संचारावर आमचे बारीक लक्ष असायचे. शिवा दिल्लीला गेला आणि त्याची जागा सुनी झाली. पिंजऱ्याजवळून जाताना नेहमी त्याची आठवण यायची. मग दिल्लीला त्याची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी मोबाइलवरुन संपर्क साधून आम्ही चौकशी करायचो. शिवा गेल्याचे समजले आणि मी तात्काळ दिल्लीला विनोदला दूरध्वनी केला. मंगळवारी रात्री शिवाचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले आणि डोळ्यात पाणी आले. मी आणि रवींद्र निवातेने शिवाची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतली होती. त्याच्या शिंगाजवळ झालेली जखम खूप दिवस बरी होत नव्हती. त्यावर उपचारही सुरू होते. अखेर ही जखमच त्याच्या जीवावर बेतली, अशी खंत राणीच्या बागेत शिवाची देखभाल करणाऱ्या रमेश पवारने व्यक्त केली.