मेडिकल, मेयोसह १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था चोख करण्याचा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने घेतला आहे. शासनाच्या समितीने या संस्थांमध्ये नुकतेच सर्वेक्षण केले. सर्व संस्थांमध्ये सुरक्षा हायटेक करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, उद्घोषणा प्रणाली, वॉकी टॉकी उपलब्ध करून देण्याचा निर्णय समितीने घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल.
नागपूर, यवतमाळ, अकोलासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, ४ शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, ३ शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयात कमी दरात बीपीएल रुग्णांवर कमी खर्चात उपचार केले जात असल्याने रोजच गर्दी असते. गर्दीमुळे बरेदा मुलं चोरी जाण्याचा प्रकार, तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण अशा घटना घडतात. उच्च न्यायालयाने शासनाला त्यांच्या शासकीय रुग्णालयात मुलं चोरी प्रकरणी घटना टाळण्याकरिता व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बऱ्याच शासकीय रुग्णालयात मेडिकलसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह सुरक्षा प्रणालीची पर्याप्त व्यवस्था नाही. नुकतेच मेडिकल रुग्णालयात बऱ्याच डॉक्टरांना मारहाण, तोडफोडीच्या घटना घडल्या. या प्रकरणाचा धसका घेत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समितीने राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे , उद्घोषणाप्रणाली, वॉकीटॉकी पोहोचणार आहे. खाजगी सुरक्षारक्षकांच्या हाती ‘हायटेक’ सुरक्षा प्रणाली येणार असल्याने निश्चितच येथील गैरप्रकाराला आळा घालण्यात प्रशासनाला मदत मिळणे शक्य असल्याचे बोलले जात आहे.
सीसीटीव्ही प्रणाली समितीने पाहिल्याने ती योग्य वाटली असून मॉनिटरिंगमध्ये मेयोचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक २४ तास मोबाईल वर संस्थेतीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरील फुटेज पाहू शकतात त्यामुळे ती राज्यात राबविता येणार काय. या करिता प्रयत्न करण्याचे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.