दिवंगत पं. सी. आर. व्यास हे ऋषितुल्य आणि ज्ञानवंत व्यक्तिमत्त्व होते. बंदिशी काय असतात, त्या कशा कराव्यात आणि त्या कशा गाव्यात याचे परिपूर्ण ज्ञान त्यांना होते, असे प्रतिपादन गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात केले.
सी. आर. व्यास वंदना या कार्यक्रमात किशोरीताई यांच्या हस्ते एका ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. पं. व्यास यांनी १९८३ मध्ये सादर केलेला राग मलुहा केदार आणि काही गाणी या ध्वनिफितीमध्ये आहेत. त्या वेळी पं. व्यास यांना तबलासाथ केलेले उस्ताद झाकीर हुसेन, पं. व्यास यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध संतुरवादक पं. सतीश व्यास या वेळी उपस्थित होते. नाव आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींपैकी ज्ञानाकडे लक्ष द्यावे, यावर पं. व्यास यांचा भर होता. एक वेळ नाव पुसले जाईल, पण ज्ञान निरंतर व चिरंतन राहील आणि ते आपल्यासोबत असेल, असे ते सांगायचे, असेही किशोरीताई म्हणाल्या.
पं. व्यास यांचा सांगीतिक वारसा त्यांचे सतीश, सुहास, शशी हे तीन सुपुत्र पुढे चालवीत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात पं. नयन घोष (सतार) आणि इशान घोष (तबला) यांच्या मैफलीने झाली. त्यानंतर पं. राजन आणि साजन मिश्रा यांनी शास्त्रीय गायन सादर केले. त्यांना पं. सुरेश तळवलकर (तबला), अजय जोगळेकर (संवादिनी) यांची संगीतसाथ मिळाली.