भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या त्वरित मिळण्यासह या संदर्भातील इतर समस्या सोडविण्यासाठी १५ एप्रिलपासून शिबिराचे आयोजन करण्याचे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर विकास आघाडीच्या सहविचार सभेत देण्यात आली.
आघाडीचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे, समन्वयक प्रा. पुरुषोत्तम रकिबे, कार्याध्यक्ष बी. एन. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी कार्यालयाने काही उपक्रम राबविल्यास आपले संपूर्ण सहकार्य राहील. तसेच कर्मचाऱ्यांना कर्ज, विम्याचे हप्ते भरावयाचे असल्याने त्यांचे वेतन महिन्याच्या एक तारखेलाच करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. डीएड्, बीएड् श्रेणी मान्यता, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक मान्यता, सर्व संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या अद्ययावत सेवाज्येष्ठता याद्या, २०१३-१४ आणि १४-१५ च्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियोजन, शालेय वार्षिक तपासणी, सर्व कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तक मिळणे, वैद्यकीय देयके ज्येष्ठतेनुसार तयार करणे, अशा अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली.
निफाड, येवला, मालेगाव या तालुक्यांसाठी ५ एप्रिलपासून शिबीर घेऊन याआधीच्या पावत्यांचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन कार्यालयाच्या वतीने देण्यात आले. उच्च माध्यमिकच्या संच मान्यता व मूल्यांकनासंदर्भात ६ एप्रिल रोजी प्राचार्याची बैठक घेण्यात येणार
आहे. पुढील शैक्षणिक वर्षांतील पहिल्या सत्रात दोन आणि दुसऱ्या सत्रात दोन सहविचार सभा घेण्यात येतील. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी वैयक्तिक तक्रारींसंदर्भात १० ते पाच या वेळेत स्काऊट गाईड कार्यालयात बैठक घेण्यात येणार असल्याचे या वेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. सभेस वेतनपथके अधीक्षकासह वरिष्ठ लिपिक व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.