दुरगंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य असलेल्या सार्वजनिक प्रसाधनगृहांमुळे महिलांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून महिलांना स्वच्छ सार्वजनिक प्रसाधनगृहे उपलब्ध व्हावीत यासाठी राष्ट्रवादीच्या महिला सरसावल्या आहेत. येत्या १ जूनपासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी अभियान राबवून महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
मुंबईतील सार्वजनिक प्रसाधनगृहात तुंबलेली शौचकूपे, अपुरा पाणीपुरवठा, दाराला कडय़ा नसणे, कचराकुंडय़ांचा अभाव, खिडक्यांना तावदाने नसणे, मोडकी दारे, स्वच्छतेचा अभाव असे चित्र दृष्टीस पडते. महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक प्रसाधनगृहांची अवस्था यापेक्षा निराळी नाही. नाईलाजाने महिलांना अशा अस्वच्छ प्रसाधनगृहांचा वापर करावा लागत आहे. परिणामी काही वेळा महिलांना संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो.
महिलांना स्वच्छ सार्वजनिक प्रसाधनगृहे उपलब्ध व्हावीत यासाठी मुंबई महिला राष्ट्रवादीच्या काँग्रेसने मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून १ जून रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान येथील महिलांच्या सार्वजनिक प्रसाधनगृहावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
या प्रसाधनगृहात स्वच्छता राखण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांमध्ये, तसेच महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच जी. टी. रुग्णालय, हज हाऊस, सीएसटी रेल्वे स्थानक आदी ठिकाणच्या सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये जाऊन तेथे स्वच्छता पाळण्याबाबत सूचना करण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहांची मार्गदर्शकतत्वे महिलांना समजावून त्यांना स्वच्छतेचे हक्क व अधिकार यांची जाणीव करुन देण्यात येणार आहे. या मोहिमेत महिलांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले आहे.