‘नमस्कार. आपल्याला कुठे जायचे आहे?’ असा प्रश्न तुम्ही थांबविलेल्या एकाद्या रिक्षा चालकाने विचारला तर आश्चर्यचकीत होऊ नका. परिवहन विभागाच्या पश्चिम उपनगर विभागाच्या ‘सौजन्य अभियानां’तर्गत मानसिकता बदललेला तो रिक्षा चालक असू शकतो.
मुंबईतील रिक्षा चालकांची मनमानी आता नवीन राहिलेली नाही. प्रवाशांशी सतत हुज्जत घालणे, भाडे नाकारणे आणि भाडय़ाच्या रकमेवरून प्रवाशांशी झगडणे हीच प्रतिमा रिक्षा-टॅक्सी चालकांची मुंबईकरांना सतत दिसत असते. ही मानसिकता बदलण्यासाठी परिवहन विभागाने ‘गांधीगिरी’ सुरू केली आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांची मानसिकता बदलून त्यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे आणि त्यातून प्रवाशांबरोबर सौहार्दपूर्ण संबंध निर्माण व्हावेत यासाठी सौजन्य अभियान सुरू करण्यात आले आहे. पश्चिम उपनगरातील रिक्षा चालकांना प्रवाशांबरोबर कसे वागावे याचे धडे देण्यात आले असून त्यांना १२ मुद्दय़ांची नियमावली देण्यात आली आहे. रिक्षा-टॅक्सी हा ‘व्यवसाय’ नसून ती ‘सेवा’ म्हणून चालकांनी करावी असा प्रयत्न परिवहन विभागाचा असल्याचे सांगण्यात येते. रिक्षा-टॅक्सी चालकांची मानसिकता बदलली तर मुंबईच्या प्रवाशांची त्यांच्या बाबत असलेली समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकेल, असेही मत परिवहन अधिकारी व्यक्त करत आहेत.
सौजन्य अभियान १९ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले असून आतापर्यंत १००हून अधिक रिक्षा चालकांना तसे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी ‘रिक्षावाला बदलतोय’, ‘मुंबई बदलतेय’ अशा घोषणा असलेली गीते, छोटय़ा गप्पांची कथानके आदींचा वापर करण्यात आला आहे. प्रवासी त्यांच्या वाहनाकडे आला की प्रथम ‘नमस्कार, तुम्हाला कुठे जायचे आहे?, असा प्रश्न विचारून प्रवाशांना रिक्षात बसवेल. तर प्रवास संपून भाडे घएतल्यावर प्रवाशांना ‘आभारी आहे, धन्यवाद’ असे म्हणत निघून जाईल, अशी कल्पना या सौजन्य अभियानात मांडण्यात आली आहे.
रिक्षाचालकांसाठी १२ मुद्दय़ांची नियमावली
प्रवासी देवोभव: हाच भाव मनी बाळगेन; वाहतूक नियमांचे पालन व शिस्तबद्ध वाहतुकीसाठी वचनबद्ध राहीन; रिक्षा व्यवसाय नसून रिक्षा सेवा हीच भूमिका; लहान मुले, महिला, वयोवृद्ध आणि अपंग प्रवाशांची अधिक काळजी घेणार; इलेक्ट्रॉनिक मीटरचाच वापर करणार; मुंबईतील पर्यटनस्थळांची माहिती देणारी प्रवासी मार्गदर्शिका सदैव वाहनात बाळगणार; जवळचे भाडेदेखील माझ्यासाठी मौल्यवान; मद्यपान, गुटखा, पानबिडीला थारा नाही; अपघात आणि आपत्कालिन प्रसंगी माझी भूमिका एका जागृत नागरिकाची; वाहनांची सर्व कागदपत्रे विधीग्रा’ा ठेवणार; प्रवाशांना आकर्षण वाटेल अशी वाहनात स्वच्छता बाळगणार; सिग्नलचे पालन करणार; योग्य ठिकाणीच गाडी उभी करणार आणि लेनमधूनच वाहन चालवणार.