दिवसेंदिवस उग्र होत जाणाऱ्या वाहतूक समस्येवर उत्तर नाहीच, मग महसूल तरी गोळा करावा, असा विचार सध्या मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेत फोफावल्याचे दिसत आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याऐवजी, वाहनचालकांनी ते पायदळी तुडवावेत म्हणजे त्यांच्याकडून दंडवसुली करून महसुलात भर घालता येईल, यासाठीच जणू आडोशाला दबा धरून बसणारे वाहतूक पोलीस अनेक मोक्याच्या रस्त्यांवर आढळत आहेत.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांकडे आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असलेल्या रस्त्यांवर शिस्तीत, सिग्नलजवळच उभे राहून वाहतुकीचे नियमन करणारे वाहतूक पोलीस अन्य अनेक रस्त्यांवर मात्र, सिग्नलपासून दूरवर, रस्त्याच्या कडेला एखादा आडोसा पाहून दडून बसतात आणि ‘सावज’ टप्प्यात येताच त्याच्याकडून पैसे उकळतात, अशा तक्रारी नेहमी होत असतात. मोक्याच्या रस्त्यावर काही तास ‘कामगिरी’ बजावली की, बऱ्यापैकी महसूल खिशात गोळा होतो, अशी प्रामाणिक कबुलीही काही जण देतात.
काही वाहतूक पोलीस मात्र, सरकारी तिजोरी भरण्याचे काम करताना दिसतात. सिग्नलपासून दूरवर उभे राहून अचानक समोर येत वाहन बाजूला घेऊन दंडाची पावती फाडणाऱ्या या पोलिसांपुढे कोणतेही स्पष्टीकरण चालत नाही. बोरिवलीच्या लिंक रोडवर दहिसरच्या दिशेने ‘ऑरा रेस्टॉरंट’च्या सिग्नलवर गेल्या शनिवारी, १२ जानेवारीच्या दुपारच्या एका प्रसंगामुळे, ‘पोलिसांपुढे शहाणपण नाही’ याचा अनुभव एका वाहनचालकाने घेतला. त्या रस्त्यावर ‘हिरवा सिग्नल’ मिळाल्यानंतर रस्ता कापणाऱ्या एका वाहनधारकास सिग्नलपासून कित्येक मीटर दूर उभ्या असलेल्या दोघा वाहतूक पोलिसांनी अडविले व ‘पैसे आत्ता भरणार, की चौकीवर’, असा थंड सवाल केला. आपण काय गुन्हा केला, हे समजण्याआधीच त्या वाहनधारकाकडील लायसेन्सही त्यांनी ताब्यात घेतले.
‘तुम्ही सिग्नल तोडलात. शंभर रुपयांची पावती फाडावी लागेल’.. रस्त्याच्या कडेला, एका निवांत सावलीत, मोटारसायकलला टेकून उभ्या असलेल्या दुसऱ्याने सांगितले. शांताराम संभाजी मेहेत्रे असे नाव त्याच्या छातीवर दिसत होते. ‘पण मी सिग्नल तोडलेला नाही’.. तो वाहनचालक ठामपणे म्हणाला. ‘तुम्ही इतक्या दूरवरून कसे काय वाहतुकीचे नियमन करता’, असा आश्चर्यभरित सवालही त्याने या पोलिसास केला. ‘तुम्ही माझा इंटरव्ह्य़ू घेताय काय, पैसे द्या’.. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेले मेहेत्रे म्हणाले. एव्हाना पावती तयार झाली होती. ‘मी सिग्नल तोडलेला नाही, तरीही तुम्ही माझ्याकडून दंड घेत आहात’.. असे सांगून वाहनचालकाने नाराजी व्यक्त केली, पण मेहेत्रे थंड होते. ‘तुम्ही तक्रार करू शकता’. असे सांगून त्यांनी पावती फाडली. तक्रारीचे काहीही होणार नाही, याची खात्री त्यांच्या थंड चेहऱ्यावर दिसत होती.  
‘त्यापेक्षा सिग्नलजवळ उभे राहिलात, तर कुणीच सिग्नल तोडणार नाही. लांब उभे राहून पावत्या फाडण्यापेक्षा वाहतुकीला शिस्त लावा’.. एव्हाना त्या वाहनचालकाचा संयम संपला होता, पण मेहेत्रे शांत होते. ‘आम्हाला महसूलवाढीचे आदेश आहेत’.. ते म्हणाले. तोवर आणखी एकाला त्यांच्या सहकाऱ्याने ‘बाजूला’ घेतले होते. तो गयावया करत होता.. पुढे काय झाले, ते कळण्याआधीच या वाहनचालकाने दंडाची पावती खिशात घातली आणि तो पुढे निघाला.