मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील लक्झरी बसगाडय़ांचे अपघात रोखण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी मद्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसात ८२ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये मद्यप्राशन करून लक्झरी चालविणाऱ्या एका चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या शिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय ठाणे ग्रामीण पोलिसांनी घेतला आहे.
मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गवरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी महामार्गावर मद्यपी चालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे यांच्या पथकाने महामार्गावरील तलासरी येथील दापचरी नाक्यावर शुक्रवारी रात्री विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये ८२ लक्झरी चालकांची श्वास विश्लेषक यंत्राच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक लक्झरी चालकाने मद्य प्राशन केल्याचे आढळून आले असून त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच नाकाबंदी दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या
१५० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.