आगामी काळात पाणी व पीक नियोजनाला सर्वाधिक महत्त्व राहील. त्यासाठी स्वतंत्र जलसंधारण व्यवस्था असणे गरजेचे आहे. निधीची कमतरता हा महत्त्वाचा विषय नसून सर्वाची कृतिशील मानसिकता गरजेची आहे. उस्मानाबादच्या जनतेने ही मानसिकता दाखवल्यास संभाव्य जलसंकटाचा मुकाबला करणे शक्य आहे, असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी केले.
उस्मानाबाद व तुळजापूरकर नागरिक, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी पाणी बचत व नियोजनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने चर्चासत्राचे केले होते. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हटे, उपाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर, पंचायत समिती सभापती प्रेमलता लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास आदी उपस्थित होते.
सध्या पाण्याचा अतिउपसा होत असल्यामुळे जमिनीतील पाणीपातळी झपाटय़ाने खालावत आहे. त्यामुळे पाणी व पीक नियोजनाची सर्वाधिक गरज निर्माण झाली आहे. येत्या ३ ते ४ वर्षांत त्याबाबतचे नियोजन आपण करू शकलो नाही तर सिंचनाचे गंभीर प्रश्न निर्माण होतील, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली.
खासदार डॉ. पाटील यांनी पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगितले. आमदार निंबाळकर यांनी ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पाणी वापर कमी होऊन सिंचनक्षेत्र वाढते, असे म्हटले. जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी प्रास्ताविक केले.