कर्करोग रुग्णालयासाठी राखीव असलेली जागा ‘सेव्हन हिल्स’ रुग्णालयाला बहाल केल्यानंतर महानगरपालिका कर्करोग रुग्णालयासाठी अजूनही चाचपडतेच आहे. दरवर्षी कर्करोगाचे १० हजाराहून अधिक रुग्ण मुंबईत वाढत असून टाटा रुग्णालयावरील वाढता भार कमी करण्यासाठी तातडीने नवीन रुग्णालय सुरू करण्याची गरज होती. मात्र अजूनही पालिकेची कर्करोगाविरोधातील लढाई निविदाप्रक्रियेतच अडकली आहे.
अंधेरी येथील कर्करोग रुग्णालयासाठी राखीव ठेवलेली जागा खासगी सहभागातून विकास करण्याच्या उद्देशाने सेव्हन हिल्सकडे देण्यात आली. या रुग्णालयामुळे पालिकेच्या पदरी अपयश तर आलेच; शिवाय कर्करोगाबाबत पालिकेची उदासीनताही दिसून आली. मुंबईतील आरोग्य सुविधांचा आढावा घेतल्यावर कर्करोगावरील रुग्णालयाची उणीव प्रकर्षांने दिसून आली व पालिका प्रशासनाने वडाळा येथील मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण मंडळाकडील अतिरिक्त जागेकडे मोहरा वळवला.
राज्य सरकारच्या ताब्यातील या जागेवर कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी दोन वर्षे मंजूर होत नसल्याने पालिकेकडे पर्याय उरला नाही. त्यानंतर  स्वत:च्याच रे रोड येथील अहिल्याबाई होळकर या मोडकळीला आलेल्या रुग्णालयाच्या जागेसाठी पालिकेने निविदा मागवल्या. सेव्हन हिल्सच्या अनुभवाने तोंड पोळल्याने या रुग्णालयाच्या निविदाप्रक्रियेतील अटीशर्थी अधिक कडक करण्यात आल्या. मात्र त्यामुळे पालिकेच्या निविदेला कोणत्याही खासगी संस्थेने प्रतिसाद दिलेला नाही. आता या अटी थोडय़ा शिथिल करून पुन्हा निविदा काढण्यात आल्या आहेत. ‘खाजगी सहभागातून रे रोडवरील अहिल्याबाई होळकर येथे ८० खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती खासगी सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष मुझुमदार यांनी दिली. मात्र या प्रस्तावित रुग्णालयाची क्षमता केवळ ८० खाटांचीच असल्याने मुंबईतील कॅन्सर रुग्णांच्या प्रचंड संख्येला ते कसे पुरे पडेल, हा प्रश्नच आहे.
भारती कर्करोग संस्थेच्या अहवालानुसार २००८ मध्ये मुंबई परिसरात कर्करोगाचे ११,३०० नवीन रुग्ण आढळले. त्यात ५२०४ पुरुष असून ६०९६ स्त्रिया होत्या. एकटय़ा टाटा स्मारक रुग्णालयात एका वर्षांत ३४०४ नव्या रुग्णांची नोंद झाली. केईएम, शीव, नायर, हिंदुजा, बॉम्बे, कामा आणि जसलोक रुग्णालयात ३००० हून अधिक नवीन रुग्ण कर्करोगावरील उपचारांसाठी आले.
पुरुषांमध्ये फुप्फुस तसेच प्रोस्टेट ग्रंथी, मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. एक लाख पुरुषांमध्ये अनुक्रमे ९.७, ७.७ आणि ६.२ प्रमाण आहे. महिलांमध्ये स्तनांचा, गर्भाशय मुखाच्या आणि अंडाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.