राज्यातील महिला आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हावी म्हणून तयार करण्यात आलेल्या बचत गटांचा वापर अलीकडे राजकारणासाठी केला जात असल्याचे जगजाहीर आहे. पण याच बचत गटाच्या प्रमुख महिला सर्वपक्षीय उमेदवारांकडून लक्ष्मीदर्शन पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवारांचा प्रचार संपल्यानंतर रात्री-अपरात्री दूरध्वनी करीत असल्याने उमेदवार अक्षरश: बेजार झाल्याचे चित्र आहे.
बचत गटातील महिलांना प्रत्येकी एक हजारपासून तीन हजार रुपयांपर्यंत बिदागी मिळत असून काही हुश्शार गटप्रमुख सर्व पक्षांच्या उमेदवारांचे दरवाजे ठोठावत असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने उघड झाले आहे. याशिवाय काही बचत गट हे साहित्याच्या स्वरूपात मदत घेत असल्याचे समजते. ठाणे जिल्ह्य़ात दोन लाख महिलांचे बचत गट असून नवी मुंबईत साडेपाच हजार बचत गट आहेत.
कामगार चळवळ काळाच्या ओघात नामशेष झाल्यानंतर राजकर्त्यांना हुकमी प्रचारक मिळेनासे झाले होते. त्याच काळात महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली बचत गटांची निर्मिती सुरू झाली. देशात आज बचत गट निर्माण करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. अनेक बचत गटांना या शासकीय- निमशासकीय शासनाचे अनुदान मिळत असल्याने ते खऱ्या अर्थाने सक्षम झालेले आहेत. नाण्याची ही एक बाजू असताना दुसऱ्या बाजूला या बचत गटांचा वापर राज्यकर्ते हुकमी मतांची गुतंवणूक म्हणून करू लागले आहेत. त्यासाठी अनेक पक्षांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांचे बचत गट तयार केले असून यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आघाडीवर आहेत. राज्यात ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक बचत गट असून त्यात नवी मुंबई आघाडीवर आहे. त्यामुळे बचत गटांना सक्षम करण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रारंभीची गुंतवणूक स्वत:हून दिली आहे. यात स्वप्रेरणेने बचत गट निर्माण करणाऱ्या महिलांबरोबच लाभ पदरात पाडून घेण्यासाठी पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी हे गट तयार केले आहेत.
बचत गटांच्या अनुषंगाने रोजगार, स्वयंरोजगार, व्यवसाय, प्रशिक्षण इथपर्यंत मर्यादित असलेली ही चळवळ आज थेट राजकारणाच्या आखाडय़ात उतरली असून आता या बचत गटांनी तडजोडीचे सक्षमीकरण सुरू केले आहे. त्यामुळे सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवणाऱ्या राजकरणाच्या मागे हे बचत गट फरफटत जात असून माणसी एक हजार ते तीन हजार रुपये पदरात पाडून घेतले जात आहेत.
विशेष म्हणजे केवळ एका उमेदवाराच्या चरणी निष्टा न वाहता ह्य़ा गटाच्या प्रमुख महिला सर्व उमेदवारांशी संर्पक साधत आहेत. दिवसभर प्रचारात राहणाऱ्या या उमेदवारांना रात्री दहानंतर संर्पक साधला जात असून आमच्याकडे महिलांची इतकी संख्या आहे. त्यानुसार इतके पैसे द्या, अशी थेट मागणी केली जात आहे. अशा प्रकारे पैसे देण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या बेलापूर मतदारसंघातील एका उमेदवाराने ही कैफियत नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.