पुढील महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक प्रत्येक पक्षाचा कस पाहणारी ठरणार असून त्यातच प्रचारासाठी केवळ १५ ते २० दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने पक्षांचे प्रमुख नेते आणि उमेदवारांसाठी ‘रात्र थोडी अन् सोंगं फार’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकिकडे प्रचारासाठी असणारा कमी कालावधी उमेदवारांच्या हुषारीची परीक्षा पाहणारा असेल तर, दुसरीकडे हा कमी कालावधी त्यांच्यासाठी खर्च कमी करणाराही ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे तंत्र आणि मंत्र अगदीच वेगळे असते. लोकसभा निवडणुकीत बहुतांश प्रमाणात उमेदवारापेक्षा पक्ष पाहून मतदान केले जाते. तर, विधानसभा निवडणुकीत उमेदवाराची प्रतिमा हा मुख्य विषय ठरतो. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ते सांभाळणे हे उमेदवारांसाठी अधिक कठीण आणि डोकेदुखीचे काम होऊन बसते. एखाद्या उमेदवाराचे कमीतकमी शंभर कार्यकर्ते असले तरी त्यांचा एका दिवसाचा खाण्यापिण्यासह सर्व प्रकारचा खर्च हा किमान १० ते १५ हजारापर्यंत जातो. प्रचाराचा कालावधी जितका अधिक तितका हा खर्च वाढत जातो. परिस्थिती बेताची असलेल्या एखाद्या उमेदवाराने कसाबसा जमविलेला पैसा प्रचाराच्या सुरूवातीच्या दिवसांमध्येच संपुष्टात येतो. प्रचार ऐन रंगात आला असताना केवळ पैशांअभावी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्यास तेही आपणास वाऱ्यावर सोडतील हे लक्षात घेऊन कुठूनतरी उसनवारी करून, कर्ज काढून उमेदवार कार्यकर्त्यांवर पैसा खर्च करतो. पैशाने गडगंज असलेल्या उमेदवारांना खर्चाची चिंता नसते.
यावेळी आघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटपाचा घोळ कमालीचा रंगला. उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवसांचा अवधी असताना त्यांच्यातील घोळ मिटला. आघाडीपण तुटली आणि महायुतीही. त्यामुळे आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यासही प्रत्येक राजकीय पक्षास कमी अवधी मिळाला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारास सुरूवात होणार असल्याने उमेदवारांना कार्यकर्ते सांभाळण्याचे काम केवळ १५ दिवसच करावे लागणार आहे. म्हणजेच प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चात दिवस कमी झाल्याने बचत होणार आहे. सर्वच उमेदवारांसाठी ही एक दिलासादायक बाब ठरणार आहे. प्रत्येक पक्ष या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरणार असल्याने निष्टावान कार्यकर्ते आणि संधीसाधू कार्यकर्ते यांच्यातील फरक कळण्यास उमेदवारांना मदत होणार आहे. प्रचारादरम्यान प्रत्येक पक्षाच्या फेऱ्यांमध्ये हजेरी लावणाऱ्यांची संख्या कमी नाही. परंतु आघाडी आणि महायुतीतील बिघाडी या निवडणुकीत अशा कार्यकर्त्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. प्रचारासाठी असलेल्या कमी कालावधीचा उमेदवार किती कल्पकतेने उपयोग करतो हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. कमी अवधीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे अशक्य असल्याने त्यासाठी उमेदवारांना वेगवेगळे फंडे वापरावे लागणार आहेत.