निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांनी विविध समाजाचा आणि सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषत: दलित आणि मुस्लिम समाजासह विविध समाजातील लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना विविध प्रलोभने आणि आश्वासने देऊन पाठिंबा मिळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतीय जनता पक्षाकडून नितीन गडकरी निवडणूक रिंगणात असून गेल्या एक वर्षांपासून विविध समाजाचे मेळावे आयोजित करून त्यामध्ये ते सहभागी होत आहेत. निवडणूक तारखा घोषित होण्याच्या पूर्वी चिटणीस पार्क मुस्लिम समाजाचा मेळावा, त्यानंतर दलित समाजाचा आणि लोधी समाजाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून त्या त्या समाजातील समस्या समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. गेल्या काही वर्षांतील निवडणुका बघता दलित आणि मुस्लिम समाज हा भाजपकडे फारसा वळला नाही. मात्र, यावेळी त्यांची मते मिळावी या उद्देशाने त्या समाजाचे मेळावे आयोजित केले. या शिवाय अग्रवाल समाज, चार्टर्ड अकाऊंटंट, डॉक्टर्स, वकील यांचे मेळावे आयोजित करण्यात आले.
काँग्रेसने मुस्लिम समाजाचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार हुसेन दलवाई, क्रिकेटपटू मो. अझरुद्दीन आदी मान्यवर उपस्थित राहणार होते. मात्र, गारपिटीचे कारण देऊन तो रद्द केला. मुत्तेमवार यांच्या समर्थनार्थ आता विधानसभा मतदारसंघनिहाय समाजाचे मेळावे आयोजित केले जात आहेत.  
नागपुरात भाजप-सेना युतीचे नितीन गडकरी, काँग्रेसचे विलास मुत्तेमवार, आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया, बहुजन समाज पक्षाचे मोहन गायकवाड, फॉरवर्ड ब्लॉककडून विदर्भवीर जांबुवंतराव धोटे निवडणूक रिंगणात आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात यापैकी तीनच उमेदवार अंतिम लढतीत राहण्याची शक्यता असली तरी सध्या या सर्व उमेदवारांनी मतदारांचा पाठिंबा मिळावा म्हणून जिवाचे रान करणे सुरू केले आहे. प्रचारकाळात समाजाच्या विविध घटकात काम करणाऱ्या बिगर राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळाला तर अनुकूल वातावरण निर्मिती होते, असे बहुतेक उमेदवारांना वाटते. म्हणूनच आता या प्रमुख उमेदवारांनी अशा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमागे पाठिंबा जाहीर करण्याचा लकडा लावला आहे. गेल्या काही वषार्ंपासून ओबीसींच्या प्रश्नावर लढा देणाऱ्या संघटना या भागात सक्रिय आहेत. त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून कांॅंग्रेस, भाजप व बसपाचे नेते प्रयत्नशील आहेत.
भाजप-सेना उमेदवारांच्या समर्थनार्थ नुकताच लोधी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला. या पहिल्या मेळाव्यानिमित्त लोधी समाज एकत्र आला. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी मेळाव्याला हजेरी लावून गडकरी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. अग्रवाल, राजस्थानी, बंगाली, दलित, आदिवासी, गुजराती आदी समाजाचे मेळावे आणि बैठकी आयोजित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांची धडपड सुरू असून त्या त्यापक्षातील समाजाच्या प्रमुखाला ती जबाबदारी देण्यात आली आहे. बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार विविध समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.
नागपुरात बहुतेक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये तेली, माळी, कुणबी या समाजातील कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या संघटनांचा पाठिंबा मिळावा यासाठी त्या त्या समाजातील पक्षातील कार्यकर्त्यांना मेळावे आणि बैठकी आयोजित करण्याचे आदेश पक्षाच्या नेत्यांनी दिले.
सामाजिक संघटनांसोबतच विविध व्यवसायात काम करणाऱ्या संघटना सोबत असाव्यात यासाठीही हे उमेदवार प्रयत्नशील आहेत. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार मोहन गायकवाड कुणबी समाजाचे असून दलित समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्या संघटनांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. उमेदवारांच्या या धावपळीमुळे सध्या अशा संघटनांचा भाव जरा वधारला आहे.