तेराव्या शताब्दीतील संगीततज्ज्ञ व ग्रंथकार शारंगदेव यांच्या नावाने चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन महात्मा गांधी मिशन संगीत अकादमीतर्फे (महागामी) करण्यात आले आहे. दि. १८ ते २१ दरम्यान एमजीएम परिसरात होणाऱ्या महोत्सवात दररोज सायंकाळी साडेसहा वाजता नृत्य-संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या दिवशी दररोज सकाळी १० वाजता विविध विषयांवर परिसंवादही होईल.
शैक्षणिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शारंगदेव महोत्सवाचे यंदा तिसरे वर्ष असून संकल्पना पार्वती दत्ता यांची आहे. या निमित्ताने भारतीय पारंपरिक कलाक्षेत्राशी संबंधित महान गुरू व संशोधक असणाऱ्यांना शारंगदेव पुरस्काराने गौरविले जाते. यंदा प्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांना भारतीय संगीताचा प्रचार व प्रसार, तसेच ज्येष्ठ भरतनाटय़म गुरू डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम यांना नृत्यातील शोधकार्य या साठी सन्मानित केले जाणार आहे.
शारंगदेवकृत ‘संगीत रत्नाकर’ विषयावर दररोज सकाळी १० वाजता व्याख्यान होणार आहे. डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम यांचे ‘संगीत रत्नाकरमधील मूलभूत तत्त्वे’, डॉ. जी. वेणू यांचे  ‘कुडीअट्टम नृत्यामध्ये संगीत रत्नाकरमधील नवरस’, डॉ. भरत गुप्ता यांचे ‘भारतीय संगीतावरील ग्रंथाचा प्राचीन, मध्य आणि आधुनिक काळातील प्रवास’, तर ‘शास्त्र व परंपरा यातील मूलभूत तत्त्वे, आशिष संस्कृत्यायन- संगीत रत्नाकरमधील संगीताच्या संकल्पना’ या विषयावर गुरू राणी कर्णा यांची व्याख्याने होणार आहेत.
दि. १८ ला पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन, डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम यांचे भरतनाटय़म व महागामी ग्रुपतर्फे कथक नृत्य सादर केले जाणार आहे. दि. १९ ला आशिष संस्कृतीयान यांचे ध्रुपद गायन व गुरू राणी कर्णा यांचे कथक नृत्य होणार आहे. दि. २० ला प्रसिद्ध तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांची संकल्पना असणारा मृदंग कीर्तन व कपिला वेणू यांचे कुटीअट्टम नृत्याचे सादरीकरण होणार आहे. गुरू पार्वती दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्या कथक नृत्य सादर करणार आहेत. १२
ज्योतिर्लिंगावर आधारित स्तुतिपुराण, १४ व्या शतकात देवगिरी येथे गोपाळ नायक यांनी गायलेल्या मूळ रचनेचे सादरीकरण, ‘पढंत’ व ‘तत्कार’ यावर ‘वर्णरीती’ चे सादरीकरण केले जाणार आहे.
महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकारांविषयी
पं. हरिप्रसाद चौरसिया- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक. बनारस येथील पंडित राजाराम यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण. १९८४ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित. १९९२ मध्ये पद्मभूषण व कोणार्क सन्मान. १९९४ मध्ये यशभारती सन्मान. २००० मध्ये पद्मविभूषण. हाफिज अली खान पुरस्कार, तसेच दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. या वर्षी ७१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे व जगात संस्कृतीचा प्रसार केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांची ङल्ल्रॠँ३ ्रल्ल ३ँी १ीि१ ऋ ं१३२ ंल्ल ि’ी३३ी१ म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१२ मध्ये ओरिसा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान.
डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम – प्रसिद्ध भरतनाटय़म नर्तिका. संशोधिका. नृत्य दिग्दर्शिका, गायिका, संगीतकार, शिक्षिका, लेखिकासुद्धा आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक के. सुब्रह्मण्यम यांच्या त्या कन्या होत. प्रात्यक्षिक वा प्रत्यक्ष सादरीकरण आणि लेखी वा शास्त्रीय ज्ञान यातील दरी दूर करणाऱ्या पहिल्या नृत्यांगना. पॅन एशियन रीसर्च सेंटर ऑन परफॉर्मिग आर्ट्स या संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त. के. सुब्रह्मण्यम मेमोरियल ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सच्या विश्वस्त, तसेच केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीच्या सभासद. पद्मश्री व पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, तमिळनाडू सरकारचा कलैममानी व राज्य कलाकार पुरस्कार. जपानचा फुकोका आशियन कल्चरल प्राइज हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या जगातल्या एकमेव नृत्यांगना.
आशिष संस्कृत्यायन – डागर घराण्याच्या परंपरेतील ध्रृपद गायक. सुप्रसिद्ध ध्रृपद गायक उस्ताद रहीम फहीमुद्दीन डागर, उस्ताद झिया फरीदुद्दीन डागर हे त्यांचे गुरू. सध्या भोपाळ येथील उस्ताद अलाउद्दीनखान अ‍ॅकेडमी ध्रृपद केंद्राचे संचालक. गेल्या १२ वर्षांपासून त्यांनी ५०० ध्रृपद गायनाचे कार्यक्रम अनेक देशांमध्ये सादर केले आहेत.
गुरू राणी कर्णा – कथक नृत्यांगना. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या. नृत्याचार्य नारायणप्रसाद, पंडित सुंदरप्रसाद व पंडित बिरजूमहाराज यांच्याकडे शिक्षण. जयपूर व लखनौ घराण्यांचा मिलाफ. कथक नृत्यामधल्या सूक्ष्म छटा, बारकावे असण्यासोबतच लालित्यपूर्ण नर्तन. सूरदास आणि हरिदास यांच्या काव्यांचा, रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांचा नावीन्यपूर्ण वापर कथक नृत्याच्या आधारे राणी कर्णा सादर करतात. लंडनच्या ‘आर्ट्स गार्डियन’ ने नृत्याच्या परिघ विस्तारणाऱ्या मोजक्या नृत्यांगना म्हणून त्यांचा गौरव.
पं. सुरेश तळवलकर – तालयोगी व श्रेष्ठ तबलावादक. पं. पंढरीनाथ नागेशकर, पं. विनायकराव घांगरेकर यांच्याकडे तबल्याचे धडे गिरवले. ‘मृदंग-कीर्तन’ या कीर्तनावर आधारित नावीन्यपूर्ण संकल्पनाचे शिल्पकार. पंडितजींनी ‘तालयात्रा’, ‘लयकल्पना’ व ‘तालमाला’ यासारखे कार्यक्रम आयोजित केले आहेत. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, वसंतराव नाईक पुरस्कार, नादब्रह्म पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. जगद्गुरू शंकराचार्य यांनी ‘तालयोगी’ म्हणून तळवलकरांचा सन्मानकेला. शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी त्यांना माजी राष्ट्रपती  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार.
कपिला वेणू – केरळच्या कुटीअट्टम नृत्यप्रकाराच्या नृत्यकार. कुटीअट्टमचे नृत्याचे आद्य गुरू अम्मानूर माधम चक्यार, कुटीअट्टमचे नर्तक, अभ्यासक वडील गोपाळ वेणू आणि मोहिनीअट्टमच्या गुरू निर्मला पानीकेर यांच्या शिष्या. न्यूयॉर्क, जपान या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सध्या पारंपरिक कला नृत्य संशोधन केंद्र ‘नटनकैरळी’ च्या संचालिका, दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा व सिंगापूर येथील आंतरसंस्कृती नाटय़ संस्थेच्या मानद अध्यापक. ‘उस्ताद बिसमिल्लाह खान’ व संस्कृती पुरस्कारांनी सन्मान.
गोपाळ वेणू – कुट्टीअट्टम नृत्याचे नृत्यकार, शिक्षक व अभ्यासक. नटनाकैराली या पारंपरिक कला संशोधन व प्रयोगकेंद्राचे संस्थापक. केरळी नृत्यकलेवर १४ पुस्तके लिहिली. पैकी ‘कुटीअट्टममध्ये नाटय़निर्मिती’, ‘केरळमधील पारंपरिक पपेट कला’, ‘कथकली नृत्य आणि कथकलीची भाषा’, ‘कुटीअट्टम व इतर नृत्यप्रकार’ ही काही प्रमुख पुस्तके. केरळ साहित्य अ‍ॅकेडमी अ‍ॅवॉर्ड, केरळ कलामंडलम, २००७ मध्ये जपानमधील सन्मानाचा निक्केई, आशिया संस्कृती पुरस्काराचे धनी.
डॉ. भरत गुप्त – भारतीय शास्त्रीय परंपरांचे अभ्यासक, नाटय़शास्त्र अभ्यासक, सितार आणि सुरबहार वादक, संगीततज्ज्ञ, सांस्कृतिक विश्लेषक, स्तंभलेखक. सितार व सुरबहार यांचे शिक्षण पंडित उमाशंकर मिश्रा यांच्याकडे घेतले. प्राचीन भारतीय संगीत व आधुनिक भारतीय संगीत, योगसुत्र, भारतीय शास्त्र यांचाही अभ्यास आचार्य के. सी. बृहस्पती आणि स्वामी कृपालवनंदा यांच्या मार्गदर्शनाखाली केला.
भारतीय व ग्रीक नाटय़शास्त्रांचा तौलनिक अभ्यास यावर डॉक्टरेट. ग्रीसमध्ये ओनस्सिस फाऊंडेशन या प्राचीन ग्रीकनाटय़ पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या संस्थेत संशोधक म्हणून काम केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मानद प्राध्यापक.