08 March 2021

News Flash

नवी दिल्लीतील महाराष्ट्राच्या रथनिर्मितीत सोलापूरच्या युवा चित्रकाराचा सहभाग

उद्या, रविवारी २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा रथ सहभागी होणार आहे.

| January 26, 2014 01:35 am

उद्या, रविवारी २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा रथ सहभागी होणार आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडविणाऱ्या या रथाच्या निर्मितीसाठी सोलापूरच्या रमण आदोने या युवा चित्रकाराने महत्त्वाचा हातभार लावला आहे. रमण याच्या रूपाने सोलापूरच्या चित्रकाराला हा प्रथमच बहुमान मिळाल्याने अवघ्या सोलापूरकरांना त्याचा अभिमान वाटतो.
मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ स्कूलमधून चित्रकलेची पदवी संपादन करणाऱ्या रमण नागनाथ आदोने (३४) व त्याच्या सहकाऱ्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील प्रा. विजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा रथ तयार करण्यासाठी कष्ट घेतले आहेत. हा रथ उद्या नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आदी उच्च पदस्थांसह परदेशी पाहुण्यांसमोर दौडणार आहे. रथावर मुंबई व परिसरात वेढलेल्या समुद्रासह दर्शनी भागात मासा असून भोवताली कोळी बांधव असतील. नऊवारी साडय़ा परिधान केलेल्या कोळी महिला व समुद्रात नाव वल्हविणाऱ्या कोळी तरुणांचे नृत्य रथावर होईल. महाराष्ट्राच्या राज्याच्या निर्मितीचे प्रतीक ठरलेल्या मशाली अशा स्वरूपाची प्रतिकृतीही महाराष्ट्र हा रथावर पाहावयास मिळणार आहे. हा वैशिष्टय़पूर्ण रथ घडविण्यात प्रा. विजय सपकाळ व रमण आदोने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेले कष्ट नवी दिल्लीत कौतुकाचा विषय ठरणार आहे.
शहरातील गुरुवार पेठेतील रेडिमेड कपडय़ांचा व्यवसाय करणाऱ्या आदोने कुटुंबीयात रमण आदोने याचा १९८० साली जन्म झाला. त्याचे वडील नागनाथ आदोने व त्यांचे बंधू वडिलोपार्जित रेडिमेड कपडय़ाचा व्यवसाय करतात. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते काशीनाथ आदोने यांचा रमण हा पुतण्या आहे. कलाव्यासंगाची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना रमण  याने स्वत:च्या हिमतीवर मुंबईत स्थायिक होऊन कलेचा खडतर मार्ग निवडला. जे. जे. मधून कलेची पदवी संपादन केल्यानंतर तो गेल्या सात-आठ वर्षांपासून आपल्या स्वतंत्र कलाविष्कारात प्रामाणिकपणे काम करीत आहे. चित्रात बिंदुतंत्राचा चांगल्या रीतीने वापर करणारा रमण हा आपल्या चित्रातून गोलाकार लय आणि तरंग निर्माण करतो. हे लय व तरंग चित्रातील आशयाची एकरूप होतात. त्याची ख्याती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये कोरिया येथे होणाऱ्या कोरियन नेचर आर्टिस्ट असोसिएशनच्या कार्यकाळेसाठी रमण आदोने हा सहभागी होणार आहे. आतापर्यंत त्याच्या चित्रांची प्रदर्शने मुंबईसह देशात ठिकठिकाणी भरली असून त्याच्या काही चित्रांना सुवर्णपदक मिळाले आहे. त्याच्या एकेका चित्राची किंमत ५० हजार ते एक लाखापर्यंत आहे. त्याने रेखाटलेल्या सुवर्णपदकप्राप्त ‘हार्मोनियस’ पोट्रेटची विक्री ९० हजारांस झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 1:35 am

Web Title: car creation for delhi in maharashtra young painter
टॅग : Maharashtra,Solapur
Next Stories
1 ‘आप’ची कराड दक्षिण व शहर कार्यकारिणी जाहीर
2 मिरजेतील नाटय़गृहात बालगंधर्वाचा पुतळा बसवण्यात प्रशासनाचे औदासिन्य
3 रिपाइं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सांगलीत मारामारी, पाच जखमी
Just Now!
X