निर्मलग्राम संकल्पना पुरस्कार, निधी किंवा राजकारणासाठी नाही तर भविष्यातील पिण्याचे पाणी, पर्यावरण, आरोग्यासाठी आहे. या सर्वाचा महिलांशी निकटचा संबंध असल्याने निर्मलग्राम ही महिलांच्या भवितव्याची चळवळ आहे. ज्या गावातील महिलेच्या डोक्यावर पाण्यासाठी हंडा नसेल तेच गाव खऱ्या अर्थाने आदर्श ठरेल, असे प्रतिपादन आदर्शगाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.
निर्मल भारत अभियानसाठी प्रस्तावीत करण्यात आलेल्या जिल्ह्य़ातील २१२ गावातील सरपंच, ग्रामसेवक व महिला प्रतिनिधींसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने आज नगरमध्ये विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते.
स्वच्छतेसाठी अभियान राबवावे लागत आहे हे देशाचे मोठे दुर्दैव असल्याचे मत व्यक्त करुन पवार म्हणाले की, ज्या गावातील महिलेच्या डोक्यावर पाण्याचा हंडा नाही, नैसर्गिक विधीला जाण्यासाठी अंधार पडण्याची वाट पहावी लागत नाही, सुट्टीच्या दिवशीही मुले आंगणवाडी उघडी ठेवण्याचा आग्रह धरतात, खासगी शाळेतील मुले जि. प.च्या प्राथमिक शाळेकडे वळतील तीच गावे खऱ्या अर्थाने आदर्श आहेत.
महिलांनी पुढकार घेतला तर गावात अशक्य काहीच नसते असे स्पष्ट करुन लंघे म्हणाले, जिल्ह्य़ात ५६ टक्के कुटुंबाकडे शौचालय उभारणी झाली आहे. अद्याप मोठे काम बाकी आहे, त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे, तसेच पुर्वी झालेल्या ३१२ गावांनीही सातत्य राखणे आवश्यक आहे. उपाध्यक्ष मोनिका राजळे, सीईओ रुबल अग्रवाल यांची भाषणे झाली. जिल्हा समन्वयक अशोक पावडे यांनी प्रास्तविक केले. गेल्या दोन वर्षांत एकही गाव निर्मलग्राम न झाल्याने यंदा मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, स्वच्छता कक्षासाठी यंदा २३ कोटी रुपयांचा अराखडा तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सभापती हर्षदा काकडे, बाबासाहेब तांबे, शाहुराव घुटे, प्रतिभा पाचपुते आदी उपस्थित होते.
(चौकट)
अध्यक्षांचेच गाव ‘निर्मल’बाहेर
जि. प. अध्यक्ष लंघे यांचे गावच अद्याप निर्मलग्राम झाले नाही, काही पदाधिकाऱ्यांची गावेही नाहीत, याकडे लक्ष वेधून पोपटराव पवार म्हणाले की, पदाधिकाऱ्यांनी आपली गावे निर्मलग्राम करुन जिल्ह्य़ापुढे आदर्श निर्माण करावा.