रस्त्यांवरील खड्डे आता केवळ मार्गात अडथळेच नव्हे तर जीवघेण्या अपघाताचे कारणही ठरू लागल्याची आणखी एक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. येथील वडवली विभागात भल्या मोठय़ा खड्डय़ामुळे दुचाकीस्वार वकील तरुणीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यामुळे तिचे करिअरच धोक्यात आले आहे.
दुचाकीवरून वडवली विभागातील आपल्या घरी परतत असताना अॅड. मीना राव हिला ४ ऑगस्ट रोजी खड्डय़ामुळे जोरदार धक्का बसला. तिला त्याच दिवशी उल्हासनगरमधील सेंचुरी रेयॉन कंपनीच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तिथे आठ दिवस उपचार घेतल्यानंतर अंबरनाथमधील एका खाजगी रुग्णालयात ती उपचार घेत होती. दरम्यान ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडेही तिचे वैेद्यकीय अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. अचानक समोर आलेल्या भल्या मोठय़ा खड्डय़ात गाडी आदळल्यामुळे तिच्या मणक्यांना जबर दुखापत तसेच रक्तवाहिनी दबल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले असून तिला अजून किमान तीन महिने अंथरुणाला खिळून रहावे लागणार आहे.  
गाडी खड्डय़ात आदळली तेव्हा वेदनेची एक सणक डोक्यात गेली. तसेच कमरेपासून पायापर्यंत शॉक बसल्यासारखे वाटत होते, असे अॅड. मीना रावने वृत्तान्तशी बोलताना सांगितले. दोन आठवडे वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर ती आता घरी असून अजून किमान तीन महिने तिला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. तिच्या वैद्यकीय उपचारांसाठी आतापर्यंत तब्बल एक लाख रुपये खर्च झाले आहेत. शारीरिकवेदनांबरोबरच ‘आपण आपल्या पायावर पुन्हा पूर्वीसारखे उभे राहू शकू की नाही’ या विचारांची चिंता तिला सतावते आहे.  
असले दु:ख
दुसऱ्यांना नको   
अॅड. मीना राव हिला लहानपणापासून खेळांची आवड आहे. तिला खरे तर लष्करात जायचे होते, पण ती वकील झाली. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर ती सध्या आपल्या बहीण-भावंडांसोबत राहत आहे. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्पमध्ये तिचे कार्यालय असून तिथे ती स्वतंत्रपणे वकिलीचा व्यवसाय करते. रस्त्यारील खड्डय़ांमुळे उद्भवलेल्या या दुखापतीमुळे आता माझे करिअरच पणाला लागले आहे. किमान दुसऱ्या कुणाला असले दु:ख मिळू नये, अशी भावना तिने व्यक्त केली.