रहिवासी प्रमाणपत्रावर शिक्का मागणाऱ्यास उपसरपंचाच्या पतीसह सोळाजणांनी जातिवाचक शिवीगाळ करून त्याची पत्नी व मुलास मारहाण केली. या प्रकरणाची फिर्याद मागे घेण्यासाठी दमदाटी व खोटय़ा गुन्हय़ात गोवण्याच्या प्रकरणात युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या फौजदारासह १६जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्यात आला. केज तालुक्यातील कौडगाव येथील अभिमान विश्वनाथ गायकवाड हे गावातील समाजमंदिरात बसले असता तेथून जाणाऱ्या उपसरपंचाच्या पतीला रहिवासी प्रमाणपत्रावर शिक्का मारून देण्याची विनंती केली. मात्र, गायकवाड यांना शिक्का न देता जातिवाचक शिवीगाळ करून त्यांची पत्नी व मुलास बेदम मारहाण केली. याची फिर्याद घेऊन गायकवाड पोलीस ठाण्यात गेले असता फौजदार ए. एस. जगताप यांनी त्यांना फिर्याद मागे घेण्यासाठी दमदाटी केली. त्यानंतर गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर फौजदार जगताप यांच्यासह इतर सोळाजणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.