अपघातात जखमी झालेल्या वृध्द रूग्णाच्या उपचाराचा खर्च देत नाही म्हणून वाहन चालकाला रूग्णालयाच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत डांबून ठेवल्याप्रकरणी येथील कॅम्प पोलीस ठाण्यात डॉक्टर व परिचारकविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरी पेशाकडे मानवतेची सेवा या दृष्टिकोनातून न पाहता व्यावसायिकीकरण झाल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात अडकवून ठेवणे, नातेवाईकांवर देयक भरण्यासाठी दबाव आणणे, असे अनेक प्रकार वारंवार घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील जिभाऊ देवबा सूर्यवंशी या वाहनचालकाने या संदर्भात तक्रार दिली. कॉलेज रस्त्यावरून जात असतांना जिभाऊच्या वाहनाचा धक्का एका वृध्द पादचाऱ्यास लागल्याने ते जखमी झाले. चालकाने जवळच असलेल्या रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी जखमीच्या औषधोपचाराचा खर्च करण्यासाठी जिभाऊला गळ घालण्यात आली. मात्र आपल्याकडे आता पैसे नसल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितल्यावर डॉक्टर आणि परिचारक यांनी त्याला वरच्या मजल्यावरील खोलीत नेऊन पैशांसाठी दमदाटी सुरू केली. पैसे मिळत नाहीत तोवर सुटका नाही, अशी भूमिका घेत जवळपास दहा तास डांबून ठेवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असला तरी असे वेगवेगळे अनुभव रुग्ण, त्यांचे नातेवाईक कायम घेत असतात.
नाशिक शहर वा जिल्ह्यातील इतर भागात थेट या पध्दतीने डांबले गेले नसले तरी देयक देईपर्यंत रुग्णांना सोडण्यास नकार देणे, उपचार सुरू करण्याआधीच पैसे भरण्यास सांगणे, औषधोपचार सुरू असताना औषध व तत्सम देयके भरण्यास सांगणे असे अनेक प्रकार वारंवार घडत असतात. रुग्णांचे नातेवाईक हतबल असल्याने याबद्दल फारसे कोणी तक्रारही करत नाही. रुग्णालयाचा फेरा नको अशी त्याची भावना होते. वास्तविक, प्रत्येक डॉक्टर वैद्यकीय पदवी संपादीत केल्यानंतर रुग्णसेवेची शपथ घेत असतो. त्याचे काहीं जण कटाक्षाने पालन करत असले तरी काही मात्र रुग्ण सेवेचा अर्थ विसरून गेल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. गंभीर वा अत्यवस्थ रुग्णाला रुग्णालयात दाखल करतानाच अनेक ठिकाणी अनामत रक्कम भरण्यास सांगितले जाते. या पैशांची व्यवस्था होईपर्यंत नातेवाईकांकडे तगादा लावला जातो. उपचार घेत असताना औषधे व तत्सम देयके रोख स्वरुपात द्यावी असा आग्रह धरला जातो. एखाद्या रुग्णाची आर्थिक ऐपत नसेल तर त्याला उपचार मिळणेही दुर्लभ झाले आहे, अशी एकूण वैद्यकीय क्षेत्राची स्थिती असल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. या संदर्भात ग्राहक पंचायतीचे मेजर पी. एम. भगत (निवृत्त) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देयकांसाठी या पध्दतीने रुग्णांना वेठीस धरणे मानवतेची सेवा या तत्वाला धरून नसल्याचे नमूद केले.आर्थिक स्थिती बरी नसलेल्या रुग्णांना रुग्णालये शासकीय योजनांमध्ये समाविष्ट करू शकतात. तशी व्यवस्था नसल्यास संबंधितावर पुढील उपचार करण्याऐवजी शासकीय रुग्णालयात रवाना करू शकतात. परंतु, तसे काहीच न करता रुग्ण वा संबंधित व्यक्तींना देयकासाठी वेठीस धरणे अयोग असल्याचे मत ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. रुग्ण आल्यानंतर प्रथम त्याच्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
उपचारासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना कार्यान्वित आहे. गोरगरीब रुग्णांना त्या योजनेचा लाभ देऊन उपचार करता येतील. यामुळे संबंधित रुग्णालयांसाठी देयकांचा विषय राहणार नाही, असे त्यांनी नमूद केले.