न्याय मिळण्याची शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचची मागणी
अशोका युनिव्हर्सल स्कुलने वाढविलेले शुल्क त्वरीत कमी करावे अशी मागणी करीत शुल्कवाढीला विरोध करणाऱ्या पालकांविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुल्कवाढ आणि पोलिसांमधील तक्रार याप्रश्नी लवकर निर्णय न झाल्यास पालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने दिला आहे.
रासबिहारी स्कुलच्या वतीने १०० मुलांना बेकायदेशीरपणे दाखले देऊन शाळेबाहेर काढण्याचा प्रकार चर्चेत असताना आता अशोका युनिव्हर्सलनेही त्याचा कित्ता गिरवला आहे. या प्रकारास विरोध करणाऱ्या एका पालकाविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दीनानाथ व सोनाली या चौधरी दाम्पत्याच्या ॠत्वी या मुलीचा दाखला शाळेने इ-मेलने पाठविला. त्या आधी शाळेने शुल्क भरण्यासंदर्भात फोन करून पालकांना बोलाविले. परंतु शुल्क भरण्याआधी फेसबुकवरून
पालकांना शुल्कवाढीविरोधात जागरूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना दम भरण्यात आला. याबाबत पुन्हा असे होणार नाही असे हमीपत्र लिहून देण्याची मागणी शाळेच्या संपर्क अधिकारी शुभा धारिया व श्वेता कटारिया यांनी केली. असे करण्यास चौधरी यांनी नकार देताच शालेय व्यवस्थापनाकडून पोलिसांना बोलविण्यात आले. त्यांच्या विरूध्द नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच वेळी चौधरी यांच्या तक्रारीनुसार शाळेविरूध्द गुन्हा नोंदविण्यास पोलिसांनी नकार दिला. शिक्षण बाजारीकरण विरेधी मंचच्या कार्यकर्त्यांनीही पालकांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविला जावा यासाठी प्रयत्न केले. परंतु पोलिसांनी ते मान्य केले नाही. पोलीस खासगी शाळांच्या संस्था चालकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मंचच्या वतीने करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मंचच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्वरीत कारवाई न झाल्यास मंचच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.