मृत व्यक्तीच्या नावाने जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून बोगस कुलमुखत्यारपत्र तयार केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीचा बांधकाम आराखडा मंजूर करणाऱ्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांसह बिल्डर, वास्तुविशारदांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये प्रसिद्ध विकासक हरदास थारवानी, अनिल थारवानी, सुनील थारवानी, मोहन थारवानी तसेच प्रेमासाई विकासक भागीदार जयराम निहालनी, प्रकाश पमनानी, वास्तुविशारद अनिल निरगुडे, पालिकेचे साहाय्यक संचालक नगररचनाकार, कनिष्ठ अभियंता यांचा सहभाग आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारावे गाव येथील रहिवासी संतोष देसाईकर यांचे आजोबा बाळू देसाईकर यांचे सन २००१ मध्ये निधन झाले. त्यांच्या नावाने जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. त्या आधारे कुलमुखत्यारपत्र तयार करून इमारतीचे बनावट बांधकाम आराखडे तयार करण्यात आले.
महापालिकेच्या नगररचना विभागात हे आराखडे मंजुरीसाठी देण्यात आले. या आराखडय़ाला विकासक, अधिकाऱ्यांच्या संगनमताने मंजुरी मिळाली. वडिलोपार्जित जमीन देसाईकर यांनी प्रेमासाई विकासकाला विकसित करण्यासाठी दिली होती. प्रत्यक्ष जागेच्या ठिकाणी थारवानी विकासकाचा फलक लावण्यात आला होता. त्यानंतर हा घोटाळा उघड झाला. याप्रकरणी महापालिकेचे माजी साहाय्यक संचालक नगररचनाकार चंद्रप्रकाश सिंग यांची तत्कालीन आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र आयुक्तांनी त्याची दखल घेतली नाही, असे संतोष देसाईकर यांनी सांगितले.