अहमदनगर मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार संस्थेतील सुमारे १९ लाख रुपयांच्या अपहार, फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपावरून जिल्हा उपनिबंधक, तत्कालीन प्रशासक, तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही. एस. वाघमोडे यांनी हा आदेश दिला. फौजदारी संहिता कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करुन अहवाल सादर करावा, असा आदेश आहे. संस्थेचे सभासद संजय डापसे यांनी वकिल सुहास टोणे यांच्यामार्फत दाखल केलेल्या खासगी फिर्यादित हा आदेश देण्यात आला आहे. यापूर्वीही न्यायालयाने संस्थेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश डापसे यांच्याच एका स्वतंत्र खासगी फिर्यादित दिला आहे.
सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे, तत्कालीन प्रशासक किरण आव्हाड (सहकार खात्यातील कर्मचारी), संस्थेचे अध्यक्ष शरद रच्चा, उपाध्यक्ष शरद क्यादर, संचालक दादा कळमकर, छायाताई फिरोदिया, आशाताई फिरोदिया, हिरालाल भंडारी, प्रदिप बोरा, राजकुमार गांधी, विजयसिंह परदेशी, वैभव लांडगे, अतुल भंडारी, अरविंद गुंदेचा, सुनंदा भालेराव, सुनिता सारसर, माजी व्यवस्थापक प्रकाश गांधी, विद्यमान व्यवस्थापक सुरेंद्र भंडारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश आहे. डापसे यांच्या तक्रारीत म्हटले की, प्रकाश गांधी संस्थेत सरव्यवस्थापक पदावर कार्यरत होते, त्यांचा सेवाकाल १ डिसेंबर २०११ रोजी पूर्ण झाला तरीही संचालक मंडळाने त्यांना पदावर कायम ठेवले, त्याविरुद्ध जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केल्यावर २६ ऑक्टोबर २०११ रोजी त्यांना सेवानिवृत्त करुन त्यांच्या जागी संचालक मंडलाने सुरेंद्र भंडारी यांची नियुक्ती केली. परंतु संस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने, तसेच गांधी व भंडारी यांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रे तयार करुन, संस्थेचे मर्चंट बँकेतील खात्यातून १ डिसेंबर २०११ ते ३१ मार्च २०१२ दरम्यान १९ लाख २ हजार ६७६ रुपये अनाधिकाराने व स्वत:च्या स्वार्थासाठी काढले, ही रक्कम वेगवगळ्या संस्था व दुकानांच्या नावे धनादेशाद्वारे काढण्यात आली. गांधी या पदावर नसतानाही त्यांनी सह्य़ा करुन रक्कम काढली व अपहार केला. याची माहिती संचालक मंडळाला व भंडारी यांना असतानाही त्यांनी कटकारस्थान केले.
या गैरकारभारामुळे तत्कालीन जिल्हा उपनिबंधक कैलास वाबळे यांनी संचालक मंडळ बरखास्त केले व किरण आव्हाड यांना प्रशासक म्हणून ५ मे २०१२ रोजी नियुक्त केले. आपण या गैरकारभाराची तक्रार आव्हाड व जिल्हा उपनिबंधक हौसारे यांच्याकडे केली. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. तोफखाना पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडेही तक्रार केली, परंतु कोणीही दखल घेतली नाही, त्यामुळे न्यायालयात तक्रार करत असल्याचे डापसे यांनी नमूद केले.