नदीघाटांचा वाळूचा लिलाव झालेला नसतानाही वैनगंगा नदीच्या कनेरी घाटावरून वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या कृष्णकांत सीताराम कोतपल्लीवार  निखिल विस्तारी दुर्गेवार, देवराव बांगरे व प्रभाकर भोयर या  चार वाळू माफियांवर महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. या चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोलीजवळच कनेरी वाळू घाटावरून आजवर वाळूमाफियांनी  लाखो रुपये किमतीच्या वाळूची अवैध रित्या उपसा करून त्याची वाहतूक केली आहे.
८ डिसेंबरच्या रात्री गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी किरण कुळकर्णी, नायब तहसीलदार पित्तुलवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस विभागाच्या मदतीने कनेरी घाटावरून वाळूची अवैध वाहतूक सुरू असताना छापा मारून चार ट्रॅक्टर पकडले.
वाळूची तस्करी करणारे कृष्णकांत सीताराम कोतपल्लीवार  निखिल विस्तारी दुर्गेवार, देवराव बांगरे व प्रभाकर भोयर यांच्यावर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे, याच ट्रॅक्टर मालकावर यापूर्वी वाळू तस्करी प्रकरणात पारडी (कुपी) नदीघाटावर ५० हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
दरम्यान, सातत्याने होत असलेल्या या अवैध उपशामुळे सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
  नदी पात्रातील या उत्खननाच्या जागेचे टोटलेशन मशिनद्वारे मोजमाप करून संबंधित माफियांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे स्वयंसेवक किरण दशमुखे यांनी  बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केली.