अमरावती मार्गावर अ‍ॅक्सिस बँकेची कॅश व्हॅनवर दरोडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीविरुद्ध अपहरण करून व खंडणी मागितल्याचा गुन्हा कोराडी पोलिसांनी दाखल केला आहे.
अपहरण करून खंडणी मागितल्याची घटना २५ डिसेंबर २०१२ ते १ जानेवारी दरम्यान घडली. चंद्रशेखर सुब्रमण्यम मुदलियार (रा. कोराडी रोड) व त्याच्या सहा साथिदारांनी सूर्यभास्कर चिन्नास्वामी गाऊंडर (रा. रामनगर, तेलंखेडी) यांना मोबाईलवर संपर्क साधला व घरी बोलावले. घरी आल्यानंतर आरोपींनी त्यांना पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून सूर्यभास्करच्याच सेंट्रो कारमध्ये बसवून अपहरण केले. त्यांच्याजवळून सव्वालाख रुपये घेतले.घराच्या रजिस्ट्री स्टॅम्प पेपरवर जबरीने स्वाक्षऱ्या घेतल्या. ठार मारण्याची धमकी देत आणखी तीन लाख रुपये खंडणी मागितली. याप्रकरणी सूर्यभास्कर यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर व त्याच्या सहा साथिदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अपहार केल्याप्रकरणी गुन्हा
कुरिअर कंपनीची लाखावर रक्कम हडप केल्याप्रकरणी कंपनीच्या एका पर्यवेक्षकाविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ५ जून ते १ ऑक्टोबर २०१२ दरम्यान हा प्रकार घडला. आरोपी अमोल मधुकर वासे (रा. उंटखाना) हा नितीन विठ्ठल शिंदे (रा. आकाशनगर) यांच्या जनता चौकातील आयरेमॅक्स इंडिया प्रा. लिमिटेड या कुरीयर कंपनीमध्ये पर्यवेक्षक होता. त्याने एका वाहतूकदार कंपनीला देण्यासाठी १ लाख ९ हजार २५६ रुपये घेतले मात्र, ते संबंधिक कंपनीला दिलेच नाहीत. याप्रकरणी नितीन शिंदे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपी अमोल मधुकर वासे (रा. उंटखाना) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.
स्टार बसच्या धडकेने तरुण ठार
वेगात आलेल्या स्टार बसच्या धडकेने पल्सर चालक तरुण ठार झाला. कोराडी मार्गावरील नेल्सन चौकाजवळ सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. विद्यान गुनेंद्रनाथ सरकार (रा. पोशिला अपार्टमेंट, मानकापूर) हे त्याचे नाव आहे. तो त्याच्या बजाज पल्सरने नेल्सन चौक ते मानकापूर चौकाकडे जात होता. समोरून वेगात आलेल्या स्टार बसने (एमएच/३१/सीए/६०७३) त्याला धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाला. या अपघाताप्रकरणी बस चालक आरोपी मोरेश्वर धनराज मेघरे (रा. खापरखेडा) याला सदर पोलिसांनी अटक केली.