अंबरनाथ येथील ऑरगॅनिक केमिकल कंपनीतील आग दुर्घटनेतील दोघांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित कंपनीच्या संचालकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक क रण्यात आलेली नाही.
अंबरनाथ येथील मोरीवली औद्योगिक वसाहतीत हनाका ही औषधनिर्मितीसाठी लागणारे रसायन तयार करणारी कंपनी असून तेथे तीन शिफ्टमध्ये २५ कामगार काम करीत होते. गेल्या आठवडय़ात कामगार जेवणाच्या सुट्टीसाठी बाहेर गेले असता, कंपनीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट होऊन आग लागली होती. या दुर्घटनेत कंपनीचे मालक सी. नारायण यांचा जागीच, तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या कंपनीत तयार होणाऱ्या कच्चा मालाच्या साठवणुकीसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. तसेच प्रमाणापेक्षा कंपनीत जास्त केमिकलचा साठा करून ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली असून त्यानुसार अंबरनाथ पोलिसांनी स्वत: कंपनीच्या संबंधित संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात कोणाची किती जबाबदारी होती, त्याने कशा प्रकारे निष्काळजीपणा केला, याविषयीचा तपास पोलिसांकडून सुरू असून त्यानंतरच अटकेची कारवाई करण्यात येणार आहे, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले.