डोंबिवली एमआयडीसीतील सोनारपाडा हद्दीत डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कार्यालयाजवळील मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे  दोन महिन्यापूर्वी एमआयडीसी तसेच पोलिसांनी संयुक्त कारवाईत जमिनदोस्त केली होती. याच जागेवर पुन्हा काही भूमाफियांनी नव्याने अनधिकृत बांधकामे उभारून व्यवसाय सुरू केले होते. ही बांधकामे सोमवारी एमआयडीसी तसेच मानपाडा पोलिसांनी एकत्रित कारवाई करून जमिनदोस्त केली. ही कारवाई सुरू असताना सोनारापाडा गावातील बाळाराम म्हात्रे, जयेश बाळाराम म्हात्रे, राजेश सखाराम म्हात्रे, धर्मेंद्र सिंग, ज्ञानेश्वर पाटील, राजनाथ प्रजापती, महम्मद खान, अच्युत पेटी, शहा यांनी जमाव जमवून एमआयडीसीच्या बांधकाम तोडण्याच्या कारवाईत अडथळा आणला. शिवीगाळ करून अधिकाऱ्यांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. या सर्वाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या भूखंडावर भूमाफियांनी गाळे बांधून तेथे गॅरेज, बांधकाम साहित्य, बिल्डरचे कार्यालय सुरू केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. एमआयडीसीचे नितीन वानखडे, बडगुजर, अंकुश, पोलिस अधिकारी आप्पासाहेब पाटील, मिलिंद पाटील, एम. के. बनकर यांनी ही कारवाई पार पाडली. या आरोपींमध्ये कोणी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे का याचा तपास सुरू आहे. त्या सदस्याची तक्रार ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे करून सदस्याचे पद अनधिकृत बांधकाम कारवाईत अडथळा आणला म्हणून रद्द करण्यासाठी पोलिस  हालचाली करणार असल्याचे सांगण्यात येते.