जातीच्या दाखल्यासाठी अडवणूक केली जात असल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जातपडताळणी कार्यालयास टाळे ठोकले. या विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कोंडून घातले. जातीच्या दाखल्याबाबत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत टाळे उघडणार नाही, अशी भूमिका घेत जोरदार निदर्शने करण्यात आली. अखेर अधिकाऱ्यांनी शैक्षणिकविषयक दाखले दहा दिवसांत व अन्य दाखले तात्काळ देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कोल्हापुरातील जातपडताळणी कार्यालयाच्या कामकाज पद्धतीबद्दल नागरिकात नाराजी आहे. दप्तर दिरंगाईमुळे नागरिकांना वेळेवर दाखले मिळत नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना विहित कालावधीत दाखले उपलब्ध न झाल्याने शाळाप्रवेशासह नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. मनसेने याप्रश्नी या खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा केली होती. मात्र आश्वासनाच्या पलीकडे त्यांच्याकडून कृती झालेली नव्हती.
जातपडताळणी कार्यालयाच्या कटू अनुभवामुळे मंगळवारी मनसेचे कार्यकर्ते या कार्यालयावर पोहचले. तेथे त्यांनी निदर्शने केली. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी कार्यालयाला टाळे ठोकले.
अधिकारी व कर्मचारी यांना कोंडण्यात आले. कामचुकार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी केली. कार्यालयाचे टाळे उघडून अधिकाऱ्यांना चर्चा करण्यास सांगितले. मनसेचे जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, जिल्हाध्यक्ष नवेज मुल्ला, जिल्हाध्यक्ष राजू गोरे, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, नामदेव गिरी, संजय पाटील, राजाराम पोवार आदींनी अधिकाऱ्यांसमोरच त्याच्या कामकाज पद्धतीचे वाभाडे काढले. या कार्यालयाचे विभागीय उपायुक्त वारे यांनी शैक्षणिकविषयक कामांचे दाखले दहा दिवसांत देण्याचे मान्य केले. तर अन्य दाखले तात्काळ देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. मात्र या कामात दिरंगाई झाल्यास मनसे स्टाईलने धडा शिकविला जाईल, असा इशारा देण्यात आला