स्वस्त धान्य दुकानातून वितरित केला जाणारा तांदूळ खरेदी करून काळ्या बाजारात चढय़ा भावाने विकण्यासाठी नेला जात असताना पकडण्यात आला. मालमोटारीतून गुजरातमध्ये हा तांदूळ नेण्यापूर्वीच औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडला. या वेळी तांदळाचे ४१५ कट्टे व मालमोटारीसह १७ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येऊन, चालक-क्लीनरला ताब्यात अटक करण्यात आली. अन्य दोघे पसार आहेत.
औरंगाबाद-बीड रस्त्यावर पांढरी पिंपळगाव शिवारात हॉटेल गोदावरी बिअरबारसमोर पथकाने सापळा रचून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बीड येथील सय्यद नासीर सुलेमान व राजू ट्रेडर्सचा मालक अन्वर हाश्मी अहमद हाश्मी हे दोघे स्वस्त धान्य दुकानातून वितरित केला जाणारा तांदूळ खरेदी करून, काळ्या बाजारात चढय़ा भावाने विकण्यासाठी मालमोटारीतून (एमएच २० सीटी २९२५) चालक मोईनखान हबीबखान पठाण यांच्या मदतीने गुजरात राज्यातील कवाट येथे घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या हॉटेलजवळ सापळा रचला. रात्री आठच्या सुमारास ही मालमोटार अडवून प्रत्येकी ५० किलो रेशनच्या तांदळाचे ४१५ कट्टे (किंमत २ लाख ७ हजार ५०० रुपये), तसेच सुमारे १५ लाख रुपये किमतीची १२ चाकी मालमोटार या शिवाय आरोपीच्या ताब्यात असलेले रोख ५ हजार रुपये, मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतले. चालक मोईनखान पठाण व क्लीनर दीपक शिवाजी साळवे (आडस, जिल्हा बीड) या दोघांना अटक करण्यात आली, तर अन्य दोघे पसार आहेत. दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सतीशकुमार वाघ यांच्या फिर्यादीवरून करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.